रुंदीकरण रेंगाळूनही टोलवाढीचा भूर्दंड!

0

पुणे : पुणे-सातारा राष्ट्रीय महामार्गावरील रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम 12 वर्षांपासून रडतखडतच सुरूच आहे. मात्र, काम पूर्ण होण्यापूर्वीच टोलवाढ करून त्याची वसुलीही सुरू झाली आहे.

पुणे-सातारा महामार्गाच्या देहू रोड ते सातारा या 140 कि.मी.च्या चौपदरीकरणासाठी 1999 मध्ये 60 मीटरचे भूसंपादन करण्यात आले. 2004 मध्ये चौपदरीकरणाचे काम प्रत्यक्षात सुरू झाले. ते पूर्ण झाल्यावर 2010 मध्ये सहापदरीकरणाचे काम सुरू झाले. डी. बी. एफ. ओटी. (डिझाईन बिल्ट फायनान्स ऑपरेट अँड ट्रान्स्फर) या तत्त्वावर केंद्राने रिलायन्स इन्फ्रा कंपनीला या कामाचा 1724 कोटी रुपयांचा ठेका दिला. त्याबदल्यात शिवापूर व आणेवाडी येथील टोलवर 2034 पर्यंत टोलवसुलीची परवानगी देण्यात आली आहे.

…तरीही 40 टक्क्यांची वाढ
महामार्ग प्रधिकरणाला या टोलवसुलीतून दरवर्षी 90 कोटी रुपये प्रीमियम मिळणार असून, दरवर्षी त्यात 5 टक्के वाढ होणार आहे. रस्त्याचे काम मार्च 2013 पर्यंत पूर्ण करण्याची अट घालण्यात आली होती. मात्र, ही मुदत संपून चार वर्षे उलटून गेल्यानंतरही काम पूर्ण झालेले नाही. काम पूर्ण नसतानाही 40 टक्के टोलवाढ करून त्याची वसुलीही सुरू झाली असून, या रखडलेल्या कामांच्या खर्चाचा भुर्दंड वाहनचालकांना बसत आहे.

काम पूर्ण होण्याबाबत साशंकताच
या महामार्गावर गेल्या 12 वर्षांपासून काम सुरू आहे. पुणे ते सातारा या दरम्यान सलग सरळ गाडी चालवणेही सध्या शक्य नाही. पुणे-सातारा महामार्गावरील मूळ ठेकेदारांचे उपठेकेदार पैसे न मिळाल्याने काम सोडून निघून गेल्याचे प्रकार घडले आहेत. तसेच, भूसंपादन न झाल्याने व शेतकर्‍यांना मोबदला न मिळाल्यानेही काम रखडले आहे. भोर तालुक्यातील 21 कि.मी.चा रस्ता, उड्डाणपूल, वळणरस्ता, भुयारी मार्गाचे काम आजही अपूर्ण आहे. 2017 पर्यंत हे काम पूर्ण करायचे आहे. मात्र कामाची संथ गती कायम राहिल्यास या वर्षातही हे काम पूर्ण होईल की नाही, याबाबत साशंकताच आहे.

भोर, वेल्ह्यात असंतोष
खेडशिवापूर टोलनाक्यावर भोर व वेल्हे तालुक्यातील 3 हजार वाहनधारकांना फ्री पास देण्यात आले आहेत. त्यातील काही पास वापरात नसल्याने ते रद्द केले आहेत. भोर, वेल्हे तालुक्यातील लोकल वाहनांना एखादा पुरावा दाखविल्यावर टोलवरून सोडले जात होते. मात्र दोन महिन्यांपासून वाहनांना अडवून त्यांच्याकडून जबरदस्तीने टोलवसुली सुरू आहे. त्यामुळे वाहनचालकांत असंतोषाची भावना आहे. त्यामुळे भविष्यात या परिसरात या असंतोषाचा भडका उडण्याचीही शक्यता आहे.