रुग्णकल्याण समितीची सभा उधळली

0

वरणगाव। शहरातील ग्रामीण रुग्णालयात रुग्ण कल्याण समितीची सभा रुग्णालयातील डॉक्टरांच्या कक्षाचे दार बंद करून सुरू असल्याची माहिती येथील सामाजिक कार्यकर्ते व नगरसेवकांना मिळताच रुग्णालयाला जोपर्यंत कायमस्वरुपी डॉक्टर मिळत नाही तोपर्यंत या ठिकाणी कोणतीही सभा होवू देणार नाही, असा आक्रमक पवित्रा घेत बंदद्वार सभा गावातील नागरीकांनी उधळून लावल्याने गावात मोठी खळबळ उडाली.

वर्षभरात प्रथमच सभेचे आयोजन
मार्च 2016 नंतर प्रथमच या ठिकाणी 16 रोजी रुग्णकल्याण समितीच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. बुधवार, 16 रोजी सकाळी 11 वाजेच्या दरम्यान सभा सुरू असल्याची माहिती काही सामाजिक कार्यकर्त्यांना मिळाल्याने त्यांनी ग्रामीण रुग्णालयात धाव घेतली. त्या ठिकाणी डॉक्टरांच्या कक्षाचे दार लावुन सभा सुरू असल्याचे दिसताच सभा उधळून लावण्यात आली.

जिल्हा वैद्यकिय अधिकार्‍यांचे आश्‍वासन विरले हवेत
या सभेला हजर असलेले पंचायत समितीचे गटविकास अधिकारी मावळे, डॉ. चॉदा, समिती सदस्य सुधाकर जावळे, सुनिल काळे, डॉ.बळीराम जंगले, संजय जैन यांच्यात चर्चा चालु असतांना नगरसेवक नितीन माळी, सुनिल बढे, गंभीर माळी, मिलिंद मेंढे आदी गावातील नागरीकांनी कक्षाचा दरवाजा लोटुन आत प्रवेश केला व या ठिकाणी एक वर्षापासुन कायम स्वरुपी डॉक्टर नाही, रुग्णांना योग्य सुविधा नाही, कर्मचारी वर्ग परिपुर्ण नाही, असलेल्या कर्मचार्‍यांवर नियंत्रण नाही, औषधसाठा योग्य प्रमाणात नाही तर सिव्हील सर्जन भामरे यांनी वरणगांव ग्रामिण रुग्णालयाला दिलेल्या भेटी दरंम्यान त्यांना सर्वपक्षीय नेत्यांनी घेराव घातला होता तेव्हा त्यांनी लेखी आश्वासन दिले, होते की, आठ दिवसात कायमस्वरुपी डॉक्टरांची नियुक्ती करतो व तोपर्यंत तात्काळ म्हणुन चार डॉक्टरांच्या दोन-दोन दिवसाच्या बदल्या वरणगांव रुग्णालयात करुन देतो. मात्र यावर पाणी फिरले आहे.

डॉक्टरांकडून वरिष्ठांच्या आदेशाला केराची टोपली
परंतु त्यांच्या या आदेशालाही संबधीत डॉक्टरांनी केराची टोकरीत टाकुन या ठिकाणी गेल्या तीन महिन्यांपासुन एकही डॉक्टर कामावर हजर न झाल्याने या रुग्णालयात येणार्‍या रुग्णांचे हाल होत असल्याचे निदर्शनास आणुन दिले व जोपर्यंत या ठिकाणी कायमस्वरुपी डॉक्टरांची नियुक्ती केली जात नाही तोपर्यत रुग्णकल्याण समितीची सभा घेण्यात येवु नये व कोणत्याही प्रकारचा खर्च मंजुर करण्यात येवु नये. असे सांगुन जर रुग्णकल्याण समिती सदस्याचे वरीष्ठांंकडून एकले जात नसेल तर त्यांनी सामुहिक राजीनामे देवुन प्रशासनाचे लक्ष वेधुन डॉक्टरांची नियुक्ती करण्यास भाग पाडावे असे या ठिकाणी सांगुन सदर सभा उधुळुन लावण्यात आली.