रुग्णवाहिका अपघाताची होणार चौकशी

0

अपघाताची कारणे शोधण्यासाठी समिती स्थापणार

देहूरोड । देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या त्या रुग्णवाहिकेच्या अपघाताची कारणे शोधण्यासाठी समिती तयार करण्यात येणार असून या अपघाताची सर्वबाजुंनी चौकशी केली जाईल, अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजीत सानप यांनी दिली. अवघ्या चार महिन्यांपुर्वी खरेदी केलेल्या रुग्णवाहिकेला मंगळवारी रात्री साडेआठच्या सुारास अपघात झाला होता. संबंधित वाहनाचा ब्र्रेक नादुरुस्त झाल्यामुळे अपघात घडल्याची चर्चा आहे. तर दुसरीकडे वाहन नवीन असल्यामुळे ब्रेक नादुरुस्त होण्याचा प्रश्‍नच उद्भवत नाही, असा तर्क अधिकार्‍यांकडून लावला जात आहे. या पार्श्‍वभूमीवर बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजीत सानप यांना विचारले असता, या प्रकरणात सर्वप्रकारची माहिती घेण्यात येणार असून सर्व बाजुंनी चौकशी करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

ब्रेक ऑईलची पातळी कमी
अपघातग्रस्त रुग्णवाहिकेतील ब्रेक ऑईलची पातळी सुरुवातीपासूनच कमी होती. मागील दोन महिन्यात ती आणखी कमी झाली, अशी माहिती रुग्णवाहिकेच्या चालकांपैकी एकाने मागील महिन्यातच सांगितले होते. याबाबत दोन-तीन वेळा ट्रान्सपोर्ट विभागाला कळवूनही दखल घेतली नसल्याचेही संबंधित चालकाने त्यावेळी सांगितले होते. मात्र, नुकताच या वाहनाला अपघात झाल्यामुळे हा मुद्दा प्रकाशात आला आहे.

ट्रान्सपोर्ट विभागाने आरोप धुडकावले
संबंधित चालकाच्या माहितीप्रमाणे जर ब्रेक ऑईल कमी असेल, आणि त्यामुळे ब्रेक नादुरुस्त होऊन अपघाताला कारणीभूत ठरला असेल, तर मात्र, हे प्रकरण वेगळेच वळण घेण्याची शक्यता आहे. ट्रान्सपोर्ट विभागाचे प्रमुख किरण गोंटे यांनी या आरोपांना धुडकावून लावले आहे. माझ्याकडे कुठलीही तक्रार नसल्याचे त्यांनी सांगितले. याबरोबरच आपल्याला बदनाम करण्यासाठी कुणीतरी अफवा पसरवत असल्याचे ते म्हणाले. बोर्डाने मात्र, या अपघाताची कारणे शोधण्यासाठी द्विसदस्यीय समिती नेमण्याचा निर्णय घेतला आहे. यात चालकाची चूक होती, की अन्य कारणामुळे हा अपघात घडला याची कसून चौकशी करण्यात येणार आहे.