पुणे । प्रतिनिधी तातडीच्या रुग्णांमध्ये गर्भवती महिलांचाही समावेश केलेला आहे. गर्भवतीस प्रसूतिवेदना सुरू झाल्यास डायल 108 या सुविधेद्वारे रुग्णवाहिका बोलावता येते. राज्यात तब्बल 19 हजार महिलांची प्रसूती या धावत्या रुग्णवाहिकेतच झाली आहे, तर लाखो गर्भवतींना तिने रुग्णालयात पोहोचवले आहे. त्यामुळे गर्भवतींसाठी ही रुग्णवाहिका ‘लाइफलाइन’ ठरली आहे. गर्भवतीस प्रसूतीवेदना सुरू झाल्यास रुग्णवाहिका बोलावता येते. त्या गर्भवतीला जवळच्या उच्च वैद्यकीय सुविधा उपलब्ध असलेल्या (टर्शरी केअर) सरकारी किंवा खासगी रुग्णालयात घेऊन जाते. मात्र, रुग्णालयात घेऊन जात असताना बर्याच गर्भवतींची प्रसूती ही धावत्या रुग्णवाहिकेतच होते. दरम्यान रुग्णवाहिकेत एक डॉक्टर उपलब्ध असल्याने आणि त्यांना प्रसूतीचे ट्रेनिंग देण्यात आले असल्याने ते प्रसूती करू शकतात, अशी माहिती डायल 108च्या प्रशासनाने दिली.
प्रशिक्षित डॉक्टर, नवीन उपकरणांचा वापर
रुग्णवाहिकेत प्रसूती करण्यास प्रशिक्षित असलेले बीएएमएस डॉक्टर असतात. प्रसूतीसाठी आवश्यक असणारी सर्व साधनेही रुग्णवाहिकेत उपलब्ध असतात. तसेच, प्रत्येक प्रसूतीसाठी नवीन उपकरणांचा वापर केला जातो. त्यामुळे आतापर्यंत राज्यात 19 हजार महिलांची प्रसूती रुग्णवाहिकेत झाली आहे, अशी माहिती डायल 108 चे मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर शेळके यांनी दिली.
पुणे 331 तर नाशिक जिल्ह्यात 403 गर्भवती
जानेवारी ते सप्टेंबरदरम्यान राज्यात 4 हजार 463 गर्भवतींची प्रसूती ही धावत्या रुग्णवाहिकेत झाली आहे. यामध्ये नाशिक जिल्हा प्रथम क्रमांकावर असून या जिल्ह्यातील 403 गर्भवतींचा समावेश आहे. दुसर्या क्रमांकावर पुणे-331 तर तिसर्या क्रमांकावर सोलापूर-247 गर्भवतींचा समावेश आहे. तर रुग्णवाहिकेत सर्वांत कमी प्रसूती होणारे जिल्हे सिंधुदुर्ग-12, मुंबई -17 आणि भंडारा 33 हे आहेत.