वरणगाव : ग्रामीण रूग्णालय व गठीत समिती शासन नियमानुसार दर पाच वर्षाला रूग्णाच्या, कर्मचार्यांच्या रुग्णालयाच्या कल्याणाकरीता होणे अपेक्षीत असतांनाही गेल्या आठ वर्षापासून वरणगांव ग्रामीण रुग्णालयातील अधिकार्यांना रुग्ण समितीचा विसर पडला आहे. यामुळे रुग्णसेवाही विस्कळीत झाल्याने रुग्णालय वार्यावर सोडल्यासारखे दिसून येत आहे. रुग्णकल्याण समिती ही रुग्ण व कर्मचार्यांच्या हितासाठी शासनस्तरावरून व स्थानिक वैद्यकीय अधिकार्यांच्या नियंत्रणाखाली गठीत केली जाते. या समितीच्या माध्यमातून रुग्णांना पुरेशा सोयी उपलब्ध व्हाव्यात तसेच इमारतीचा प्रश्न सोडता यावा, कर्मचार्यांचे हित जोपासता यावे याकरीता रुग्ण कल्याण समिती गठीत करणे शासनस्तरावरुन बंधनकारक असते. मात्र गेल्या आठ वर्षापासून येथील ग्रामीण रुग्णालयाची रुग्णसमिती फलकावरच दिसून येत आहे.
दर पाच वर्षांनी समितीची कार्यकारिणी अपेक्षित
या कार्यकारी समितीमध्ये अध्यक्ष व सचिव स्थानिक वैद्यकीय अधिकारी असतो, तालुका वैद्यकीय अधिकारी, खाजगी वैद्यकीय व्यावसायिक, एकात्मीक बालविकास अधिकारी, पंचायत समिती सभापतींनी नामनिर्देशीत केलेल्या व्यक्ती, तहसिलदारांनी नामनिर्देशित केलेला व्यक्ती, स्वच्छता विभागाचे तालुकास्तरीय अधिकारी, स्वयंसेवी संस्थेचे अधिकारी हे सदस्यपदी नियुक्ती केलेली असते. तर नियमक समितीमध्ये अध्यक्ष उपविभागीय अधिकारी, उपाध्यक्ष, निवासी वैद्यकीय अधिकारी तर सदस्य म्हणून तहसिलदार, तालुका वैद्यकिय अधिक री, स्थानिक वैद्यकीय अधिकारी, खाजगी वैद्यकीय व्यवसायिक, एकात्मीक बालविकास अधिकारी, सार्वजनीक उपअभियंता, विधानसभा आमदारांनी नामनिर्देशीत केलेला एक प्रतिष्ठीत व्यक्ती, पंचायत समिती सभापतींनी केलेला व्यक्ती व स्थानिक स्वयंसेवी संस्थेचा प्रतिनिधी नियुक्ती करून अशा दोन समित्या शासनाकडून गठीत केल्या जातात. याच समित्यांच्या माध्यमातून हितकारक निर्णय घेतले जातात. या समित्यांची दर पाच वर्षात कार्यकारणी अपेक्षीत असते. मात्र येथील ग्रामीण रुग्णालयात गेल्या आठ वर्षापासून समिती नसल्याने हितकारक निर्णय घेण्यास अडकाठी निर्माण होत आहे.
डॉ. घोषाल यांचे झाले दुर्लक्ष
आठ ते दहा वर्षापूर्वी वरणगांव ग्रामीण रुग्णालयात तत्कालीन वैद्यकीय अधिकारी डॉ. देवश्री घोषाल यांच्याकडे शासनाकडून पदभार सोपविण्यात आला होता. मात्र कालांतरांने त्याच्याकडे न्हावी, भुसावळ, रावेर असा अतिरीक्त पदभार सोपवीण्यात आला होता. त्यांच्या दुर्लक्षीतपणामुळे वरणगांव येथील ग्रामीण रुग्णालयाची रुग्ण कल्याण समितीचा कार्यकाळ संपला होता.
प्रयत्न करण्याची गरज
नवीन कार्यकाणीची निवड करण्यासाठी पुढाकार घेतला होता. मात्र त्यांची वरणगांव येथून बदली झाली होती. तेव्हापासून आजपर्यंत शासनाने वा अधिकार्याने समिती गठीत करण्याकरीता अप्रयत्नशील ठरला आहे.
रुग्ण कल्याण समितीचे माजी सदस्य रुग्णालयात अघटीत घटनेसंदर्भात येवून आधिकार्यांसह कर्मचार्यांवर दबाव आणून चमकोगिरीचा आव आणत असल्याचे चित्र दिसून येत आहे. तरी शासनस्तरावरुन संबधीत रुग्णालयात रुग्ण कल्याण समिती गठीत व्हावी अशी अपेक्षा रुग्णाकडून होत आहे.