रुग्णसेवा सर्वात मोठे पुण्य

0

जळगाव। महामार्गालगत दररोज लहान-मोठे अपघात घडत असतात. मात्र वेळेवर मदत न मिळाल्याने अनेक नागरिक आपला जीव गमावत असतात. वेळेवर मदत मिळावी म्हणून अनेक संघटनाकडून रुग्णवाहिका समाजाच्या सेवेसाठी दिल्या जातात. इतर कोणत्याही कामांपेक्षा नागरिकांचे जीव वाचविणे यापेक्षा दुसरे मोठे पुण्य नसल्याचे मत सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. बुधवारी महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनच्या पदाधिकार्‍यांनी आपल्या खर्चातून रुग्णवाहिका लोकार्पण सोहळ्याचे आयोजन पंचायत समिती कार्यालयात करण्यात आले. या कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्र्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे समाजकल्याण समितीचे सभापती प्रभाकर सोनवणे होते. यावेळी व्यासपीठावर अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संजय मस्कर, शिवसेनेचे जिल्हा संघटक ह.भ.प. ़ज्ञानेश्वर जळकेकर महाराज, जिल्हा परिषद सदस्य पवन सोनवणे, पंचायत समिती सभापती यमुनाबाई रोटे, उपसभापती शितल पाटील, पंचायत समिती सदस्य हर्षल चौधरी, ललिता पाटील, ज्योती महाजन, जागृती चौधरी, विमलबाई बागुल, नंदलाल पाटील, संगिता चिंचोरे, निर्मला कोळी आदी उपस्थित होते़

ग्रामसेवक खरा सेवक
महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियच्या (डीएनई) 136 तालुका शाखेच्या वतीने बुधवार 19 रोजी रुग्णवाहिकेचे लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आला होता. ग्रामसेवक म्हणजे ग्रामस्थांची सेवा करणारा, त्यामुळे खर्‍या अर्थाने ते ग्रामस्थांची सेवा करत आहे़ माणसाने असे जगावे की गेल्यावर पुस्तक लिहले पाहिजे, नाहीतर असे लिहावे की गेल्यावर पुस्तके वाचली पाहिजे असे प्रतिपादन कार्यक्रमाध्यक्ष प्रभाकर सोनवणे यांनी केले.

रुग्णवाहिकेची आर्थिक तरतुद गरजेची
आपल्या उद्घाटनपर भाषणात ना़ गुलाबराव पाटील म्हणाले की, पंचायत समिती सदस्य असतांना ग्रामसेवकांची कामे जवळून बघितली आहे. ़ एखादी ग्रामसेवक संघटना आपल्या स्वत:च्या पैशातून रुग्णवाहिका उभी करते, त्यामुळे आजचा हा उपक्रम स्तुत्य आहे. दोन रुग्णवाहिका माझ्याकडेही आहे, रुग्णवाहिकेची आर्थिक तरतुद करणे फार गरजेचे आहे, निदान पेट्रोलचे तरी पैसे आपण घेतले पाहिजे, किंवा मासिक फी ठेवून खर्चजमा केला पाहिजे अशा सुचना देऊन काही मदत लागल्यास नेहमीच आपले सहकार्य असेल असे प्रतिपादनही त्यांनी केले.

शिवसेनेमुळेच झालो सभापती
समाजकल्याण सभापती प्रभाकर सोनवणे यांनी अनेकांनी मला विचारायचे की उद्घाटक म्हणून ना़ गुलाबराव पाटील आहेत आणि अध्यक्षस्थानी तुम्ही असल्यामुळे तुम्हाला काही अडचण आहे का? त्यावेळी मी त्यांना सांगितले की, ना. पाटील यांच्याशी माझे वैर नाही, माझे मित्रच आहेत़ काही समाजकंटकांनी आमच्यामध्ये वैर निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता असे सांगितले, खर तर मी शिवसेनेमुळेच सभापती झालो असल्याचे सांगितल्याने उपस्थितांमध्ये हशा पिकला़

सरपंच, ग्रामसेवक दोन चाके
अध्यक्षीय भाषणात जिल्हा परिषद समाजकल्याण सभापती प्रभाकर सोनवणे यांनी सांगितले की, ग्रामसेवक व सरपंच हे गावाचे दोन चाके असतात, गाडे जसे दोन चाकाशिवाय चालू शकत नाही, त्याप्रमाणे ग्रामसेवक व सरपंचाशिवाय गावांचा विकास होत नसतो, संघटनेने रक्तदान, वृक्षरोपण अशा अनेक उपक्रम करित आहे, तुम्हाला शासकीय योजना किंवा काही समस्या सोडविण्यासाठी नेहमी पुढे राहिल असे सांगितले. यावेळी जिल्हा कर्मचारी संघटनेचे शिवणकर यांनी संघटनेने हे प्रेरणादायी, हेवा वाटणारे काम केले असल्याचे मनोगत व्यक्त केले़. ग्रामसंघटनेचे संघटनेचे जिल्हा सचिव भारंबे यांनी सांगितले की, संघटनेच्या सामाजीक बांधलकीची जाण म्हणून ही रुग्णवाहिका सुरु केलेली आहे़ संघटनेच्या अध्यक्ष, उपाध्यक्षांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला़

संघटनेचे विशेष अभिनंदन
अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संजय म्हस्कर यांनी संघटनेचे विशेष अभिनंदन केले, ग्रामस्थांच्या जीवन मरणासंदर्भातल्या रुग्णवाहिकाचे काम तुम्ही केलेले आहे़ समाजाचे खर्‍या आर्थाने ऋण, प्रेम व्यक्त केले आहे, तसेच लोकांची चांगली नाळ यामुळे जोडली जाणार आहे़ या रुग्णवाहिकेतून जाण्याचा दुदैवी योग कोणाला येऊ नये, आणि आलाच तर आपली सेवा तत्पर राहीलच असे सांगितले़