डॉ.कुंदन फेगडे ; यावलला मोतीबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया शिबिर
यावल- मोफत मोतिबिंदू शस्त्रक्रीया झाल्यावर सुखरूप परतणार्या रुग्णांच्या चेहर्यावरील स्मित हास्य व समाधानाने प्रफ्फुल्लीत झालेला चेहरा पाहुन आपण दरमहा घेत असलेल्या या शिबिराचेे सार्थक झाल्याचा अनुभव आपणास येतो व अखंडीतरीत्या अविरत दरमहा मोफत मोतिबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया शिबिरे घेण्याची स्फूर्ती मिळते, असे मत आश्रय फाऊंडेशनचे अध्यक्ष तथा नगरसेवक डॉ. कुंदन फेगडे यांनी व्यक्त केले. ते मंगळवारी फाऊंडेशनकडून आयोजित मोफत मोतिबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया शिबिरात बोलत होते. यावल-रावेर येथील डॉक्टरांच्या आश्रय फाऊंडेशन व कांताई नेत्रालयाच्या सहकार्याने मंगळवारी भुसावळ रस्त्यालगत असलेल्या श्री कलेक्शनजवळ भव्य मोफत मोतीबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया शिबिर घेण्यात आलेे. या शिबिराच्या अध्यक्षस्थानी फाऊंडेशनचे अध्यक्ष तथा नगरसेवक डॉ.कुंदन फेगडे होते.
105 रुग्णांची तपासणी ; 14 जणांवर होणार शस्त्रक्रिया
शिबिराचे उद्घाटन मुंबईच्या कृत्रिम सांधेरोपण निर्माण कंपनीचे व्यवस्थापक शैलेंद्र फेगडे यांच्याहस्ते करण्यात आले. प्रमुख उपस्थिती फाऊंडेशनचे सचिव डॉ.पराग पाटील, डॉ.प्रशांत जावळे, कांताई नेत्रालयाचे जनसंपर्क अधिकारी युवराज देसरडा, डॉ.वैभव चौधरींसह मान्यवरांची उपस्थिती होती. शिबिरात 105 रुग्णांची तपासणी करण्यात आली. त्यातील 14 रूग्ण शस्त्रक्रियेकरीता पात्र ठरले आहे. कांताई नेत्रालयात मोफत शस्त्रक्रिया केली जाणार आहे. सूत्रसंचालन शेखर पटेल यांनी तर आभार डॉ.प्रशांत जावळे यांनी मानले. यशस्वीतेकरीता स्नेहल फिरके, भुषण फेगडे, संजय फेगडे, हेमंत फेगडे, रीतेश बारी, मनोज बारी, जयराम फेगडे, लिलाधर काटे आदींनी परीश्रम घेतले.
18 नोव्हेंबरला फैजपूरात सर्वरोग निदान शिबिर
रावेर-यावल तालुक्यातील 15 डॉक्टरांच्या या फाऊंडेशनच्या सहकार्याने व फैजपूरातील येत्या 18 नोव्हेंबर रोजी भव्य एक दिवशीय सर्वराग निदान शिबिर घेतले जाणार आहे. फाऊंडेशनच्या दरमहा राबवल्या जाणार्या या मोतीबिंदू शिबिरातून प्रेरणा घेत अनेेक सेवाभावी व्यक्तीमत्व व संघटनांकडून आरोग्य क्षेत्रात सेवेकरीता पुढाकार घेतला जात असल्याचे आश्रय फाऊंडेशन सचिव डॉ.पराग पाटील म्हणाले.
11 यशस्वी शिबिरे यशस्वी -युवराज देसरडा
आश्रय फाऊंडेशनच्या वतीने सलग वर्षभरात हे 11 वे यशस्वी शिबिर आहे. दरमहा या फाऊंडेशनच्या माध्यमातून गोरगरीब ज्येष्ठ वृध्दांना दिल्या जाणार्या सेवेतून दृष्टीहिनता दूर होत आहे. डॉ. कुंदन फेगडे यांच्या या उपक्रमातून अनेकांनी शिकवण घेत सेवाभाव कसा जोपासावा याचे उत्तम उदाहरण यातुन दिसत असल्याचे कांताई नेत्रालयाचे जनसंपर्क अधिकारी युवराज देसरडा म्हणाले.