रुग्णांना कम्युनिटी क्लिनिकचा आधार
जळगाव – रुग्णांना आपल्याच भागात वैद्यकीय सेवा मिळावी या उद्देशाने कम्युनिटी क्लिनिक सुरू करण्यात येत आहेत. त्याचा शुभारंभ शिरसोलीमध्ये झाला आहे. या ठिकाणी आतापर्यंत १३०० पेक्षा जास्त रूग्णांची तपासणी व उपचार केले गेले आहेत.
शिरसोली (प्र. न.) आणि शिरसोली (प्र. बो.) गावात १५ खासगी दवाखाने व १ शासकीय प्राथमिक आरोग्य उपकेंद्र आहे. त्यावर शिरसोली व्यतिरिक्त दापोरा, धानोरा, कुर्हाळदा, व्यंजन, रामदेववाडी अशी एकूण ७ गावे व तेथील साधारणतः २५००० पेक्षा जास्त लोकसंख्या अवलंबून आहेत. या संपूर्ण भागात एक जरी रुग्ण कोविड-१९ ना संक्रमित असेल तर त्याच्यापासून इतरांना संक्रमण होऊन रोगाचा प्रादुर्भाव खुप मोठ्या पातळीवर पसरू शकतो. हे सगळे आधीच थोपवणे जास्त गरजेचे असल्याचे मत सगळ्या डॉक्टरांकडून मांडण्यात आले. दोन्ही गावातील दवाखाना चालविणारे १६ डॉक्टर, प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी व शिरसोली ग्रामपंचायत कार्यकारिणी यांची एक बैठक (मिटिंग) घेण्यात आली. त्यात सर्वानुमते एक निर्णय घेण्यात आला आणि
२४ मार्च २०२० पासून कम्युनिटी क्लिनिक सुरू करण्यात आले.
कसे चालते काम?
- शिरसोली व आजूबाजूची ७ गावे अशा २५,००० लोकांसाठी शिरसोली प्र. न. गांवातील विठ्ठल-रुखमाई मंदिर व शिरसोली प्र. बो. येथील ग्रामपंचायत कार्यालयाचा हॉल अश्या दोन्ही ठिकाणी सं. ९ ते १२ व संध्या ६ ते ९ वेळेत ₹२०/- तपासणी शुल्क आकारून आरोग्य तपासणी व उपचार केला जात आहे.
- आशा बहिणी (ASHA sisters) येणाऱ्या प्रत्येक पेशंट ची नोंदणी करुन तो कोणत्या गावावरून आला आहे याची नोंद ठेवतात. त्याच्या हातावर सॅनिटायझर फवारून निर्जंतुक करुन घेत वेटिंग एरियामध्ये थांबवतात.
- सोशल डिस्टनसिंगचे पालन करीत हॉलचे दोन भाग करून एका ठिकाणी वेटिंग रूम तयार केली आहे. याच पद्धतीने तपासणी कक्ष तयार केला आहे. रुग्णाला सॅनिटायझर लावूनच तपासणीसाठी सोडले जाते.
- दररोज ८० ते १०० रूग्णांची तपासणी याप्रमाणे ०१-०४-२०२० पर्यंत ८ दिवसात १३०० पेक्षा जास्त रूग्णांची तपासणी व उपचार केले गेले.
- गावातील सर्व डॉक्टर एकाच ठिकाणी तपासणी करत असल्यामुळे संशयित रुग्ण लगेचच वेगळा करणे त्याला व त्याच्या परिवाराला जळगाव जिल्हा रुग्णालयात तपासणी करवणे हे काम सहजच होत आहे.
- रूग्णांकडुन घेतल्या जाणाऱ्या पैशांमधूनच कम्युनिटी क्लिनिक व इतर साहित्याचा खर्च केला जात आहे. डॉक्टर्स विनामोबदला पुर्णपणे मोफत सेवा देत आहेत.
या उपक्रमामुळे खासगी दवाखाने आठवडाभर बंद असूनही एकही रुग्ण उपचाराशिवाय राहिला असे झाले नाही. रुग्ण व डॉक्टर दोघांना संसर्गाचा धोका कमी झाला. गावातील सर्व रुग्ण एकाच ठिकाणी तपासणी करुन घेतात म्हणुन त्यांचा डेटा एकाच वेळी शासकीय आरोग्य सेवा, ग्रामपंचायत आणि खासगी डॉक्टर यांच्याकडे संकलित होतो. यामुळे हेल्थ स्क्रिनिंग सहजच शक्य झाले आहे. शासकीय आरोग्य यंत्रणेवर कोणताही अधिकचा भार नाही. गावांत एकवाक्यता आणि सुसूत्रता पाळणे सोपे झाले.
डॉ. भोजराज सावंत,
तालुका संघचालक, जळगाव ग्रामीण