रुग्णांना डायलेसिस सेवा दोन दिवसात सुरू करा

0

नवापूर । शहरातील डायलेसिस रुग्णांना प्रशासनाकडून सहकार्य मिळत नसून रुग्णांना डायलेसिस सेवा दोन दिवसात सुरू न केल्यास भारतीय जनता पार्टीतर्फे तहसीलदार कार्यालयासमोर शनिवारी, 25 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे. अशा आशयाचे लेखी पत्र नवापूरचे तहसीलदार, नंदुरबारचे जिल्हाधिकारी, नवापूरचे पोलीस निरीक्षक यांना देण्यात आले आहे.

निवेदनात म्हटले आहे, देशात कोरोनाचा प्रादूर्भाव वाढल्याने गुजरात, महाराष्ट्र सीमा सील केली आहे. त्यामुळे नवापूर शहरातील डायलेसिसचे रुग्ण जे गुजरात राज्यातील विविध शहरात जाऊन मागील आठवड्यापर्यंत उपचार घेत होते. मात्र, लाँकडाऊन झाल्यामुळे त्यांना बाहेर जाण्यास बंदी करण्यात आली. त्यामुळे नवापूर शहरातील आठ रुग्णांना नंदुरबारचे जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याशी दूरध्वनीने संपर्क साधून चर्चा करुन रुग्णांना नंदुरबार येथील जिल्हा रुग्णालय येथे पाठविण्यात आले. परंतु रुग्णांना डायलेसिस न करता परत पाठविण्यात आले. त्यानंतर त्यांना नंदुरबार नगर पालिकेच्या डायलेसिस सेंटरला पाठविण्यात आले. दुपारी 1 ते 4 वाजेपर्यत रुग्णांना बसवुन ठेवण्यात आले. तेथे उपस्थित कर्मचारी संजय पाटील यांनी नवीन रुग्ण घेत नाही व डायलेसिस करत नाही, असे कारण सांगुन त्या रुग्णांना डायलेसिस न करता परतवुन लावले.

सोशल डिस्टन्सिंगचे उल्लंघन न करता मंडपात उपोषण

सद्यस्थितीत नवापूरच्या 8 रुग्णांसाठी जिल्हाधिकारी नंदुरबार, जिल्हा शल्य चिकित्सक नंदुरबार, तहसीलदार नवापूर यांना व्हॉटसअ‍ॅप आणि ईमेलद्वारे निवेदन देण्यात आले होते. तरीही प्रशासनाकडून त्याची दखल घेण्यात आलेली नाही. प्रशासनाच्या या भुमिकेमुळे कोरोनाऐवजी उपचाराअभावी डायलेसिस रुग्णांच्या जीवाचे काय असा प्रश्न उपस्थित होत आहे. हे पाहता नवापूर भारतीय जनता पार्टीतर्फे प्रश्न सोडविण्यासाठी शनिवारी तहसील कार्यालयासमोर उपोषण करण्यात येईल. नवापूर शहरातील या रुग्णांची डायलेसिसची व्यवस्था होत नाही, तोपर्यत हे उपोषण सुरु राहणार आहे. तसेच राज्यात लावलेल्या कोविड 19 मुळे संचारबंदी व 144 कलम लक्षात घेता कायद्याचे पुर्ण पालन करुन सोशल डिस्टन्सिंगचे उल्लंघन न करता मंडपात 4 पेक्षा जास्त उपोषणकर्ता उपस्थित राहणार नाहीत, याची दक्षता घेऊनच भरत माणिकराव गावित, एजाज करीमोद्दीन शेख, प्रणव विवेक सोनार, जयंतीलाल अग्रवाल हे उपोषण करणार आहोत.

निवेदनावर शहराध्यक्ष प्रणव सोनार, जिल्हा चिटणीस एजाज शेख, तालुका सरचिटणीस दिनेश चौधरी यांचा स्वाक्षर्‍या आहेत.