प्राथमिक आरोग्य केंद्राच्या निधी खर्चावरही जिल्हा परिषदेचा अंकुश
पुणे : पुणे जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांना रुग्ण कल्याण समितीमार्फत देण्यात येणार्या निधीच्या जमा-खर्चाचा तपशील आता केंद्राच्या दर्शनी भागात लावण्यास सुरुवात झाली आहे. केंद्रांना मिळणारा निधी कशासाठी वापरला जात आहे याची माहिती सर्वसामान्यांना मिळणार आहे. तसेच निधी खर्चावरही जिल्हा परिषदेचा अंकुश राहणार आहे. परिणामी, निधीचा योग्य वापर करण्यास मदत होणार आहे.
जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाला रुग्ण कल्याण समिती अंतर्गत विविध उपक्रमांसाठी निधी प्राप्त होतो. हा निधी जिल्हा परिषदेमार्फत जिल्ह्यातील 96 प्राथमिक आरोग्य केंद्रांना वितरित करण्यात येतो. हा निधी योग्य पद्धतीने वापरला जात होत नाही. त्यामुळे बहुतांश वेळा सुविधा उपलब्ध करून देण्यात आरोग्य केंद्रामध्ये अडचणी निर्माण होतात. त्याचा आरोग्य सेवेवर परिणाम होतो. त्यामुळे आरोग्य केंद्रात उपचारांसाठी येणार्या रुग्णांकडून संताप व्यक्त करण्यात येतो.
त्याशिवाय उपलब्ध निधीतून कोणत्या वस्तू खरेदी केल्या, त्यांचा खर्च किती आणि शिल्लक रक्कम किती याची माहिती अनेकदा उपलब्ध होत नसल्याने जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने निधीचा तपशील आरोग्य केंद्राच्या दर्शनी भागात लावण्याचा निर्णय घेतला. त्याबाबत जिल्हा आरोग्य अधिकार्यांनी प्राथमिक आरोग्य केंद्रांना सूचना दिल्या आहेत.
फलक लावणे बंधनकारक
जिल्ह्यातील प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये हे फलक लावणे बंधनकारक आहे. आतापर्यंत संपूर्ण 96 आरोग्य केंद्रांमध्ये फलक लावण्यात आले. त्याबाबत तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी आणि अधीक्षक देखरेख करीत आहेत. या फलकांमुळे निधीच्या जमा खर्चामध्ये पारदर्शकता येईल. आरोग्य केंद्रांनाही निधी खर्च करताना चाप बसेल.
डॉ. दिलीप माने जिल्हा आरोग्य प्रमुख, जिल्हा परिषद