रुग्णालयाच्या बेजबाबदारपणामुळे चिमुरड्याचा उपचाराअभावी मृत्यू

0

पालघर । रुग्णालयाच्या बेजबाबदारपणामुळे नालासोपार्‍यात एका मुलाला उपचाराअभावी आपला जीव गमवावा लागल्याचे समोर आले आहे. रुग्णालयाच्या या कारभारामुळेच चिमुकल्याचा जीव गेल्याचा आरोप नागरिकांमधून होत आहे. ही घटना तुळींज पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली असून टँकर चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र बेजबाबदार रुग्णालयावर अद्याप कारवाई झाली नेल्याने या बेजबाबदार रुग्णालयावर तात्काळ कारवाई करण्यात यावी अशी मागणी होत आहे.

उपचार व्हावेत म्हणून केले 4 तास प्रयत्न
निषाद या शाळकरी मुलाला शाळेत जाण्यासाठी उशीर झाल्याने प्रवेश नाकारला गेला. त्यानंतर त्याचे वडील गोविंद घाडी यांनी आपल्या मुलाला पुन्हा आपल्यासोबत नेले. दरम्यान गोविंद यांना नालासोपारा पूर्वेकडील विजय नगर येथे दुकानात काही काम असल्याने ते आपली बाईक उभी करून मुलाला बाईकवरच थांबवून दुकानात गेले. मात्र गाडीचा तोल गेल्याने गाडीवर बसलेला निषाद खाली पडला व त्याचवेळी पाठीमागून येत असणार्‍या टँकर खाली सापडला. यात तो गंभीर जखमी झाला. यानंतर त्याच्या वडिलांनी त्याच्यावर उपचार व्हावेत म्हणून तब्बल 4 तास प्रयत्न केले. मात्र रूग्णालयाच्या बेजबाबदारपणामुळे उपचाराअभावीच निषादचा जीव गेला. त्यामुळे उपचार न करणार्‍या रुग्णालयावर कारवाई करण्याची मागणी स्थायी समिती सदस्य सुदेश चौधरी यांनी केली आहे.