रुग्णालयात रुजू होण्यास वैद्यकीय अधिकार्‍यांनी दिला नकार

0

वरणगाव। येथील ग्रामीण रुग्णालयात गेल्या तीन महिन्यांपासून वैद्यकीय अधिकारी नसल्याने येथील रुग्णसेवा विस्कळीत झाल्याने पालिकेचे गटनेते व सामाजिक कार्यकर्ते यांनी जळगाव जिल्हा चिकीत्सकाकडे जावून दोन तास ठिय्या आंदोलन करून जिल्हा चिकीत्सकांनी दोन वैद्यकीय अधिकार्‍यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र वैद्यकीय अधिकार्‍यांनी येथील रुग्णालयाचा कारभार पाहता वैद्यकीय अधिकार्‍यांनी येण्यास नाकार दिला आहे.

राजकीय परिस्थितीमुळे रुग्णालयात रुजू होण्यास नाकार
गेल्या तीन महिन्यापासून येथील ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर हर्षला चांदा हे कौटूंबीक कारणामुळे रजेवर गेल्यापासून रुग्णालयाची सेवा विस्कळीत झाली आहे. मात्र काही दिवसातच वैद्यकीय अधिकारी डॉ. देवर्षी घोषाल यांची कागदोपत्री नियुक्ती करण्यात आली होती. मात्र त्यांच्याकडे भुसावळ व यावल तालुक्यातील ग्रामीण रुग्णालयाचा अतिरीक्त भार असल्याने त्यांनी रुग्णसेवा वगळता फक्त मृतकांचे शवविच्छेदनाशिवाय कोणतीच सेवा देवू शकले नाही. पुन्हा रूग्णसेवेचा कारभार विस्कळीत झाला. त्या कारणास्थ रुग्णांना नियमीत रुग्णसेवा मिळावी यासाठी बुधवार 19 रोजी नगरपरिषेद गटनेते सुनील काळे, कास्ट्राईब संघटनेचे नेते मिलींद मेढे व सामाजीक कार्यकर्त्यांसह जळगाव जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. सुनिल भांबरे यांच्या दालनासमोर वरणगाव ग्रामीण रुग्णालयात कायमस्वरूपी वैद्यकीय अधिकार्‍यांची नियुक्ती व्हावा यासाठी ठिय्या आंदोलन करण्यात आले होते. तेव्हा डॉ. भांबरे, डॉ. किरण पाटील यांनी आंदोलकांची तात्काळ दखल घेत यावल तालुक्यातील न्हावी ग्रामीण रुग्णाल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. देवर्षी घोषाल यांची तात्पुरती तर डॉक्टर दिनेश खेताळे यांची वरणगाव ग्रामीण रुग्णालयात नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हा वैद्यकिय अधिकार्‍यांनी 20 रोजी नियुक्ती केलेले डॉक्टर रुजू होणे अपेक्षीत होते मात्र येथील राजकीय परिस्थिती व शासकीय विश्‍लेेषणानुसार वरणगाव ग्रामीण रुग्णालयात रुजू होण्यास नाकार दिल्याचे समजते.

शालेय डॉक्टरांना अधिकार द्यावे
गेल्या तीन महिन्यापासून वैद्यकिय अधिकारी रजेवर असल्याने ग्रामीण रुग्णालयातील सेवा शालेय तपासणीच्या वैद्यकीय अधिकार्‍यांकडून केली जात आहे. मात्र शालेय तपासणी अधिकार्‍यांना कोणतेही अतिरिक्त अधिकार नसल्याने रूग्णांसह नागरीकांचे हाल होत आहे. त्याकरीता या डॉक्टरांना कायमस्वरूपी करुन त्यांना सर्वस्वी अधिकार द्यावे अशी मागणी होत आहे. वरणगाव ग्रामीण रुग्णालयासाठी दोन वैद्यकिय अधिकार्‍यांची जळगाव जिल्हा वैद्यकीय अधिकार्‍यांनी तडकाफळकी नियुक्ती केली असतांना देखील येथील रुग्णालयात हजर न झाल्याने त्यांच्यावर शिस्तभंगाची कार्यवाही करण्याची मागणी करणार असल्याचे गटनेते सुनील काळे यांनी सांगितले.