रुग्णालयालाच डेंग्यूची लागण

0

बोपोडी । पुणे-मुंबई रस्त्यावरील एका महिलेचा डेंग्यूची लागण झाल्याने मृत्यू झाला. या परिसरातील आणखी पाच जणांना डेंग्यूची लागण झाल्याची माहिती पुढे आली आहे. दरम्यान एका खासगी रुग्णालयात डेंग्युच्या आळ्या सापडल्याने या रुग्णालयास महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने बुधवारी (दि.16) नोटीस बजावण्यात आली आहे. शोभा विश्वनाथ इंगवले (55, रा. बोपोडी) या डेंग्यूची लागण झालेल्या महिलेचा येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना मंगळवारी (दि.15) मृत्यू झाला. आवटी हॉस्पिटलचे डॉ. राजेश आवटी यांनी या महिलेचा मृत्यू डेंग्यूने झाल्याचे स्पष्ट केले आहे. गजबडे चाळीतील आणखी पाच जणांना डेंग्यूची लागण झाली असून ते ही याच खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. एका महिलेचा मृत्यू तसेच आणखी पाच जणांना लागण झाल्याने परिसरातील रहिवाश्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. स्थानिक नगरसेविका सुनिता वाडेकर तसेच परशुराम वाडेकर यांनी परिसराची पाहणी केली.

आरोग्य विभागाच्या वतीने कारवाईचा इशारा
दरम्यान गजबडे चाळीपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या रेणू हॉस्पिटल परिसराची महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या पथकाने बुधवारी (दि.16) दुपारी पाहणी केली असता रुग्णालय परिसरात प्रचंड घाण पसरली आहे. याव्यतिरिक्त डेंग्यूच्या आळ्याही आढळून आल्या. आरोग्य निरीक्षक गोविंद सातपुते व शैला वासकर यांच्यासह पथकाने याची गंभीर दखल घेण्यात आली. औषध व कीटक प्रतिबंधक विभागाने यावेळी या खासगी रुग्णालयास नोटीस बजावली. तसेच दोन दिवसांत परिसरातील राडारोडा, घाण तसेच डेंग्यूस पोषक असलेले पाण्याचे डबके दूर करावे, अशा सूचना देण्यात आल्या. अन्यथा महापालिका आरोग्य विभागाच्या वतीने पुढील कारवाई केली जाईल, असा इशारा यावेळी रुग्णालयास दिला.

औषध फवारणी करावी
गजबडे चाळीसह मैलाशुद्धीकरण प्रकल्पाशेजारी अतिक्रमणावर कारवाई केलेल्या भागात ही मोठ्या प्रमाणात राडारोडा, घाणीचे साम्राज्य तसेच पाण्याचे डबके आहे. येथे अर्धवट तोडलेली बांधकामे तातडीने हटवून परिसरात तातडीने साफसफाई तसेच औषध फवारणी करून डेग्यूला आवर घालावा, अशी मागणी वाडेकर यांनी महापालिका प्रशासन तसेच औंध क्षेत्रिय कार्यालयास केली आहे.

घाण व पाण्याचे डबकेही
या परिसरात प्रचंड घाण तसेच डेंग्यूस पोषक असे पाण्याचे डबके साचले आहे. अर्धवट अवस्थेतील बांधकामाच्या ठिकाणीही पाण्याचे डबके आढळून आले असून नगरसेविका वाडेकर यांनी तत्काळ औंध क्षेत्रिय अधिकार्‍यांशी संपर्क साधून सफाई कर्मचार्‍यामार्फत परिसरात साफसफाई व औषध फवारणी करून घेतली.