पुणे । महापालिकेच्या रुग्णालयात रुग्णांची मोठी गर्दी असते. रुग्णांची संख्या जास्त आणि कर्मचार्यांची संख्या कमी यामुळे रुग्णालयांमध्ये मोठ्या प्रमाणात अस्वच्छता असते. या पार्श्वभूमीवर पालिकेच्या प्रमुख पाच रुग्णालयांच्या स्वच्छतेचे काम खासगी स्वच्छता कंपनीकडून करून घेतले जाणार आहे. या प्रस्तावास स्थायी समितीने मंजुरी दिली असून यासाठी चार कोटी 34 लाखांची तरतूद केल्याची माहिती स्थायीचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांनी माहिती दिली आहे.
महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून शहरातील नागरिकांसाठी लहान मोठी रुग्णालये सुरू करण्यात आली आहेत. मोठ्या रुग्णालयांमध्ये समावेश असलेल्या कमला नेहरू रुग्णालय, सुतार दवाखाना, सोनावणे हॉस्पिटल, राजीव गांधी हॉस्पिटल तसेच नायडू सांसर्गिक रूग्णालयात उपचार घेणार्या रूग्णांची संख्या जास्त आहे. नागरिकांची संख्या जास्त असल्याने रुग्णालये अस्वच्छ होण्याचे प्रमाणही जास्त आहे. त्यामुळे या रूग्णालयांची स्वच्छताही वारंवार होणे आवश्यक आहे. त्यासाठी पालिकेचा आरोग्य विभाग तसेच घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून कर्मचार्यांची नेमणूकही करण्यात आली आहे.