पुणे । जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रावर रुग्ण कल्याण समितीची स्थापना करण्यात आली आहे. स्थानिक जिल्हा परिषद सदस्यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती स्थापन करण्यात आली असून समितीने आखून दिलेल्या नियमानुसार आरोग्य केंद्रांना काम करावे लागणार आहे. वेळोवेळी बैठकांचे आयोजन करून समितीने रुग्णांच्या हिताचे निर्णय घ्यावे, असे आदेश पुणे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने दिले आहेत.
जिल्ह्यात 96 प्राथमिक आरोग्य केंद्र, तर 539 उपकेंद्र आहेत. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि प्रत्येक नागरिकाला रुग्णसेवा मिळावी या हेतूने समितीची स्थापना करण्यात आली आहे. औषधांपासून ते विविध कामांसाठी वार्षिक पावणेदोन लाख रुपयांचा निधी समितीला उपलब्ध करून देण्यात येतो. तसेच रुग्णांच्या गरजा पाहून त्यानुसार निधी खर्च करण्यात यावा, अशा सूचना जिल्हा परिषदेने दिल्या आहेत. औषध खरेदी, बाहेरून करण्यात येणार्या प्रयोगशाळा तपासणी खर्च, अत्यावश्यक संदर्भसेवा, माता व बाळासाठी कपडे, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, बसण्याची व्यवस्था या गोष्टी समितीने पूर्ण करणे अपेक्षित आहे. यासाठी समितीच्या बैठका घेऊन त्याचे नियोजन करण्यात यावे, असे आदेश दिल्याची माहिती बांधकाम व आरोग्य समितीचे प्रवीण माने यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
बारा सदस्यांची समिती
जिल्ह्यात 96 प्राथमिक आरोग्य केंद्रे आहेत. त्यापैकी बारामती तालुक्यातील एकूण आठ आरोग्य केंद्रांपैकी चार तर अन्य काही ठिकाणच्या आरोग्य केंद्रात रुग्ण कल्याण समिती स्थापन करण्यात आलेली नाही. ही प्रक्रिया लवकरच पूर्ण होणार आहे. रुग्ण कल्याण समितीचे अध्यक्ष हे स्थानिक भागातील जिल्हा परिषदेचे अध्यक्ष असतात. तर उपाध्यक्ष हे तालुका आरोग्य अधिकार असतात. यामध्ये पंचायत समिती सदस्य, गावाचे सरपंच, स्थानिक बचत गट प्रतिनिधी, स्वयंसेवी संस्था, मागासवर्गीय प्रतिनिधी, गटविकास अधिकारी असे 12 सदस्यांची ही समिती असणार आहे. वैद्यकीय अधिकारी हे सदस्य सचिव असतील.