रुग्ण दुपटीचे प्रमाण १०.९ दिवस

0

नवी दिल्ली – देशभरात करोनाच्या रुग्णांची संख्या दुप्पट होण्याचा कालावधी वाढू लागला आहे. गेल्या १४ दिवसांत रुग्ण दुपटीचे प्रमाण ८.७ दिवस होते, ते या सात दिवसांमध्ये १०.२ दिवस तर, तीन दिवसांमध्ये १०.९ दिवस झाले असल्याची माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री हर्ष वर्धन यांनी दिली.

गेल्या आठवड्याभरात ८० जिल्ह्यांमध्ये एकही नवा रुग्ण आढळलेला नाही. ४७ जिल्ह्यांमध्ये १४ दिवसांत, तर ३९ जिल्ह्यंमध्ये २१ दिवसांमध्ये आणि १७ जिल्ह्यंमध्ये २८ दिवसांत एकाही नव्या रुग्णाची भर पडलेली नाही. गेल्या २४ तासांमध्ये १६ जिल्ह्यंमध्ये एकही नवा रुग्ण सापडलेला नाही. १२९ जिल्हे हॉटस्पॉट, ३०० जिल्हे बिगर हॉटस्पॉट श्रेणीत आहेत, अशीही माहिती हर्ष वर्धन यांनी दिली.

करोनाच्या नमुना चाचण्यांसाठी तसेच जलद चाचण्यांसाठी देशी बनावटीचे वैद्यकीय संच मे महिन्यामध्ये उपलब्ध होतील. सध्या या संचांची चाचणी केली जात आहे. त्यानंतर भारतीय वैद्यकीय संशोधन संस्थेकडून या संचांना मान्यता दिली जाईल. हे वैद्यकीय संच उपलब्ध झाल्यानंतर ३१ मेपर्यंत देशात प्रतिदिन एक लाख नमुना चाचण्या करण्याचे लक्ष्य पूर्ण करता येऊ शकेल, असेही केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.