पुणे: ज्याप्रमाणे प्रशासनाकडून शेतकरी वर्गासाठी बाजार भाव, हवामानाची माहिती मोबाइलवर एसएमएसद्वारे देण्यात येते. कोरोना संदर्भातील रुग्णांची संख्या आणि कोणत्या रूग्णालयात किती बेड शिल्लक आहेत. याबाबतची प्रत्येक गोष्टीची माहिती नागरिकांना मोबाइलवर एसएमएसद्वारे देण्यात यावी, अशी सूचना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुण्यात केली.
पुण्यातील विधान भवन आणि स्मार्ट सिटीच्या कार्यालयात शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली कोरोना विषाणू संसर्ग व केल्या जात असलेल्या उपाययोजनांच्या पार्श्वभूमीवर बैठक पार पडली. यावेळी पुण्याचे पालकमंत्री अजित पवार उपस्थित होते. कोरोना विषाणूचा प्रसार थांबविण्यासाठी स्थानिक प्रशासनाने लोकप्रतिनिधींना सोबत घेवून त्यांनी केलेल्या योग्य सूचनांचे तंतोतंत पालन करावे, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.
कोरोनाच्या लढाईत पुणे महानगरपालिकेने आर्थिक भार सहन केला आहे. याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करुन योग्य निर्णय घेण्यात येईल. कोरोना प्रतिबंधासाठी कॅन्टोन्मेंट बोर्डसाठी आणखी एक कोटी रुपयांचा निधी देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.