रुद्राक्ष, पादुका, तुळशी माळ, पंचामृत जीएसटीतून वगळले

0

नवी दिल्ली । वस्तू आणि सेवा करातून खादीचा धागा, गांधी टोपी आणि राष्ट्रीय ध्वज वगळण्यात आला आहे. यासोबतच खोटे दागिने, मोती आणि सोन्याच्या नाण्यांवर 3 टक्के कर लागणार आहे. रुद्राक्ष, पादुका, पंचामृत, तुळशीमाळ, पवित्र धागा आणि विभूती यांचा समावेश वस्तू आणि सेवा कर परिषदेने पुजेच्या साहित्यात केल्याने यावर कोणताही कर आकारला जाणार नाही.

चंदनाचा टिळा, कोणत्याही ब्रँडखाली न येणारे मध, दिवा बत्ती या वस्तूंना एक जुलैपासून अप्रत्यक्ष कर रचनेतून सूट देण्यात आली आहे. या वस्तूंवर कोणताही कर आकारला जाणार नाही. मात्र कापूर, खडीसाखर, बत्ताशा या पूजा साहित्यावर पाच टक्के कर लागणार आहे. कापड उद्योगात समावेश होणार्‍या वस्तूंचा विचार केल्यास, एक हजार रुपयांपेक्षा कमी किमतीचे अंथरुण, पांघरुण, शौचालय आणि स्वयंपाकघरात वापरल्या जाणार्‍या कपड्यांवर, टॉवेलवर 5 टक्के कर आकारण्यात येणार आहे. यासोबतच 1 हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीच्या नॅपकिन, मच्छरदाणी, पिशव्या, लाईफ जॅकेटवर 5 टक्के कर लागणार आहे. याच वस्तूंची किंमत 1 हजार रुपयांपेक्षा जास्त असल्यास 12 टक्के कर आकारणी करण्यात येईल.

रेशीम आणि जूट धागा यांना सवलतीच्या श्रेणीत ठेवण्यात आले आहे. मात्र कापूस, नैसर्गिक फायबर आणि इतर सर्व धाग्यांवर 5 टक्के कर आकारला जाणार आहे. मानवनिर्मित रेशीम धाग्यावर 18 टक्के जीएसटी आकारला जाईल. खादीचा अपवाद वगळता अन्य सर्व प्रकारच्या कपड्यांवर 5 टक्के कर लागणार आहे. गांधी टोपी आणि राष्ट्रीय ध्वज यांच्यावर कर आकारला जाणार नाही.

एक हजार रुपयांपर्यंतच्या कपड्यांवर 5 टक्के कर आकारला जाणार आहे. सध्या या कपड्यांवर 7 टक्के आकारला जातो. कपड्यांची किंमत 1 हजार रुपयांहून अधिक असल्यास 12 टक्केकर आकारला जाणार आहे. यासोबतच माचिस, डबाबंद जैविक खतांवर नव्या करप्रणालीनुसार 5 टक्के कर लागणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या अध्यक्षतेखालील वस्तू आणि सेवा कर परिषदेने जवळपास सर्व वस्तू आणि सेवांसाठी आकारण्यात येणार्‍या करांचे प्रमाण निश्‍चित केले आहे. केंद्र सरकारकडून 5, 12, 18 आणि 28 टक्क्यांवर अशा विविध टप्प्यांमध्ये कर आकारणी केली जाणार आहे. वस्तू आणि सेवा कर परिषदेत जेटलींसोबत सर्व राज्यांच्या अर्थमंत्र्यांचा समावेश होता.