जळगाव। सावखेडा शिवारातील मध्य रेल्वेच्या अपलाइनवरील रूळावर मंगळवारी पहाटे एक लोखंडी पट्टी पडल्याची माहिती रेल्वे पोलिसांना मिळताच सर्वांची एकच धावपळ झाली. दरम्यान, पहाटे लोको पायलटने रेल्वेच्या नियंत्रण कक्षात माहिती दिल्यानंतर हा प्रकार उघडीस आला. रेल्वे अधिकार्यांनी घटनास्थळावर जाऊन पाहणी केल्यानंतर त्याना प्रवासी रेल्वेच्या बॅटरीचे संरक्षण बॉक्सचे दोन लोखंडी तुकडे असल्याचे दिसताच सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. यावेळी अपर पोलिस अधीक्षक व उपविभागीय पोलिस अधिकार्यांनीही घटनास्थळी भेट दिली होती.
गांभीर्याने हालचाली
बिहार, मुंबईमध्ये रेल्वे रूळावर लोखंडी रॉड ठेऊन घातपात घडविण्याचा प्रयत्न झाल्यानंतर देशभरात हाय अलर्ट घोषित करण्यात आला होता. त्यामुळे संपूर्ण रेल्वे प्रशासन हे अलर्ट झाली आहे. यातच मंगळवारी सकाळी 6 वाजेच्या सुमारास सावखेडा शिवारातील मध्य रेल्वेच्या अप लाईनवरील खांब क्रं. 415/10 ते 415/8 दरम्यान एक लोखंडी पट्टी पडलेली असल्याची माहिती लोको पायलटने नियत्रंण कक्षात झाली. माहिती मिळताच रेल्वे प्रशासन आणि प्रशासन खडबडून जागे झाले. रेल्वे पोलिसांनी काही वेळातच सावखेडा शिवारातील घटनास्थळ गाठले.
अधिकार्यांची घटनास्थळी भेट
रेल्वे रूळावर लोखंडी पट्टी पडल्याची माहिती मिळताच रेल्वे अधिकारी, रेल्वे पोलिस दलाच्या अधिकार्यांनी लागलीच घटनास्थळाकडे धाव घेतली. सकाळी 6.15 वाजेच्या सुमारास रेल्वे पोलिस दलाचे कुंज बिहारी सिंग यांनी त्यांच्या पथकासह जाऊन घटनास्थळावरून बॅटरीच्या कव्हरचे तुकडे बाजूला केले. त्यानंतर जिल्हा पोलिस दलाला माहिती मिळाल्यानंतर अपर पोलिस अधीक्षक बच्चन सिंग, उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन सांगळे, पोलिस निरिक्षक प्रविण वाडीले, सहाय्यक पोलिस निरीक्षक दिपक गंधाले यांनी तत्काळ घटनास्थळी भेट दिली. यावेळी असिस्टंट सिक्यरिटी कमिशनर सुरेश चंद्र, जी.एन. मिना आदी अधिकारी उपस्थित होते. अधिकार्यानी रेल्वे रूळाची व सावखेडा रेल्वे पुलाची पाहणी केली. रेल्वे पोलिसांनी टॅ्रकमनच्या मदतीने लोखंडी पट्टी ही ताब्यात घेतली.
अन् सुटकेचा नि:श्वास सोडला
मुंबईकडे जाणार्या प्रवासी रेल्वेचे बॅटरीचे लोखंडी कव्हरचे पट्टी सोमवारी मध्यरात्री तुटून रूळावर पडली. त्यातला एक तुकडा अपलाईनवरील उजव्या बाजूच्या रूळावर पडला होता तर दुसरा डाऊन लाईनच्या मध्यभागी पडलेला होता. त्यामुळे मुंबईकडून भुसावळकडे येणार्या रेल्वेच्या लोकोपायलटला रूळावर लोखंडी पट्टील पडलेली दिसली आणि त्यांनी तातडीने ही माहिती नियंत्रण कक्षात दिली. त्यानंतर रेल्वे अधिकार्यांनी घटनास्थळी धाव घेऊन रूळाची पाहणी केल्यानंतर प्रवासी रेल्वेच्या आपतकालीन व्यवस्थेसाठी असलेल्या बॅटरीचे कव्हरचे नट निखळल्याने लोखंडी पट्टील पडलेल्या असल्याचे निषन्न होताच अधिकार्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. दरम्यान, ही घटना दिल्लीपर्यंत पोहोचल्याने तेथील अधिकार्यांचेही फोन रेल्वे पोलिसांना येत होती.