रुसवा सोडून अजितदादा शुक्रवारी टाकणार पाऊल!

0

पिंपरी-चिंचवड : महापालिकेची सत्ता गेल्यापासून शहरात पाऊल न ठेवलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार अखेर शुक्रवारी सकाळी नऊला येत आहेत. सत्ता काळात विविध विकासकामांचे नारळ फोडले; मात्र सत्ता बदल होताच विकासकामे तसुभरही का हलली नाहीत? हा प्रश्‍न घेवून ते महापालिका भवनमध्ये आयुक्तांशी चर्चा करणार आहेत. दरम्यान, पवार येणार असल्यामुळे पक्ष कार्यकर्त्यांमध्ये उत्साह पसरला आहे.

नाराजी झाली कमी
फेब्रुवारी 2017 मध्ये महापालिकेतील सत्ता जाऊन भाजपची एकहाती सत्ता आली. विकासकामे करुनही पराभव झाल्याने अजितदादांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर दोन महिने त्यांनी शहराकडे पाठ फिरवली होती. मध्यंतरी पक्षाच्या एका मेळाव्याच्या निमित्ताने ते हजेरी लावून गेले होते. यामध्ये त्यांनी शहरावर बोलणे पूर्णपणे टाळले होते. आता भाजपची सत्ता येऊन सात महिने झाले आहेत. त्यामुळे त्यांचा रुसवा आता काहीसा कमी झाला असून पुन्हा ताकदीने कार्यरत झाल्याचे संकेत मिळत आहेत. यातूनच सत्ता नसली तर ते महापालिकेत पाऊल टाकणार आहेत.

कामे प्रलंबीत का?
राष्ट्रवादी काँग्रेसच्या सत्तेच्या कार्यकाळात भूमिपूजन झालेल्या विकासकामांच्या सद्यस्थितीचा आढावा घेणार आहेत. तसेच शहरातील विविध प्रलंबित प्रश्नांशी आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्यासोबत चर्चा करणार आहेत. महापालिकेच्या वतीने निगडीत भक्ती-शक्ती शिल्पसमूह उद्यानालगत 107 मीटर उंचीचा ध्वजस्तंभ उभारण्यात येणार आहे. निगडीतील हा झेंडा देशातील सर्वात उंच तिरंगा झेंडा असणार आहे. पिंपरीतील जिजामाता रुग्णालय, भोसरी, चिंचवड येथील रुग्णालयाच्या कामाची सद्यस्थिती, भामा-आसखेड, पवना बंद जलवाहिनी प्रकल्प, सामाविष्ट गावातील रस्ते, आरक्षणे, रस्त्यांचे रुंदीकरण, बीआरटीएस प्रकल्प, तळवडे येथील ’डिअर’ पार्क, चिखलीतील प्रस्तावित संतपीठ, जेएनएनयूआरएम अंतर्गत असलेली प्रलंबित कामे, शहरातील अनधिकृत बांधकामे, शास्तीकर, डेअरी फार्म येथील उड्डाणपुल, दिघीमार्गावरील संत नामदेव आणि संत ज्ञानेश्वर समूहशिल्प, बोपखेलला जोडणारा पूल अशा विविध कामांचा अजितदादा आढावा घेणार आहे. तसेच शहरातील विकासकामांचे पुढे नियोजन काय असणार आहे, याबाबतही आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्यासोबच दादा चर्चा करणार आहेत, अशी माहिती विरोधी पक्षनेते योगेश बहल यांनी दिली.

‘भाजप’ची अडवणूक भूमिका
सत्ता मिळाल्यानंतर ‘भाजप’ने राष्ट्रवादीने घेतलेल्या निर्णयांवर ‘फेरविचार’ म्हणून कामे प्रलंबीत ठेवली आहेत. तसेच अनेक कामांवर आक्षेप घेत फाईल बाजुला ठेवल्या आहेत. साहजिकच विकासकामे ठप्प आहेत. महापालिका सभेत जाणीवपूर्वक बोलू न देणे, दमबाजी करणे असेही प्रकार सत्ताधारी पदाधिकारी करतात यामुळे आमची कोंडी झाली आहे. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या कामात मुद्दाम अडथळे आणले जातात. तसेच ठरवून अनधिकृत बांधकामांवर कारवाई केली जात आहे, असे गार्‍हाणे कार्यकर्ते व पदाधिकार्‍यांचे आहे. या सर्व बाबी पवारांच्या कानावर गेल्या आहेत. याविषयी पवार काय बोलतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.