रूग्णांना स्वाईन फ्लूची औषधे त्वरीत मिळण्यासाठी विशेष मोहिम

0

मुंबई : मुंबईसह राज्यभर स्वाईन फ्लूचा कहर सुरू आहे. मुंबईत स्वाईन फ्लूमुळे नुकताच एका पोलीस अधिकार्‍याचा मृत्यू झाल्याने सर्वत्र चिंतेचे वातावरण आहे. त्यातच बाजारात स्वाईन फ्लूची औषधे पुरेशा प्रमाणात उपलब्ध होत नसल्याने रुग्ण आणि नातेवाईकांच्या चिंतेत भर पडली आहे. त्यामुळे रूग्णांना स्वाईन फ्लूची औषधे पुरेशा त्वरीत उपलब्ध व्हावीत यासाठी अन्न आणि औषध प्रशासन पुढे सरसावले आहे.

विशेष कक्षाची स्थापना
स्वाईन फ्लूच्या रुग्णांना आवश्यक असलेले ओसेल्टामिवीर कॅप्सुल्स आणि सीरप सर्व किरकोळ औषध विक्रेत्यांकडे उपलब्ध होतील याकडे बारकाईने लक्ष ठेवण्याचे निर्देश एफडीएने प्रत्येक विभागीय सहआयुक्त (औषधे) यांना दिले आहेत. तर स्वाईन फ्लूची औषधे उपलब्ध करुन देण्यासाठी ’एफडीए’च्या मुख्यालयात विशेष कक्षही तयार करण्यात आला आहे. या कक्षाशी 1800222365 या क्रमांकावर संपर्क साधल्यास औषध कुठे आणि कसे मिळेल याची माहिती देण्याबरोबर औषध उपलब्ध करून देण्यासाठीची आवश्यक ती मदत केली जाईल, अशी माहिती ’एफडीए’ने एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

औषध बनवणार्‍या मोजक्या कंपन्या
लहान मुलांसाठीच्या ’अ‍ॅण्टी फ्लू लिक्विड’ची टंचाई मुंबईसह राज्यभर असल्याची माहिती ’एफडीए’तील एका वरिष्ठ अधिकार्‍याने दिली आहे. कारण ’हेटेरो’ ही हैद्राबादमधील कंपनी आणि दिल्लीतील एक छोटी कंपनी वगळता इतर कंपन्या ’अ‍ॅण्टी फ्लू लिक्विड’चे उत्पादन करत नाहीत. त्यामुळे या औषधांची टंचाई आहे. तर सिप्ला कंपनीने हे औषध तयार करण्यासाठी केंद्राकडे परवानगी मागितली आहे. पण ही परवानगी त्यांना अद्याप मिळालेली नाही.

वेबसाईटवर दुकानांचे पत्ते
असे असले तरी मुंबईसह राज्यात स्वाईन फ्लूच्या औषधांची टंचाई दूर करण्याचा प्रयत्न केल्याचा दावा ’एफडीए’कडून केला जात आहे. पुरेशा प्रमाणात औषधांची उपलब्धी करुन देण्यात आल्याचेही एफडीएने स्पष्ट केले आहे.

तर ही औषधे कुठे आणि कोणत्या दुकानात मिळतील याची यादी दुकानांच्या पत्त्यासकट ’एफडीए’च्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. तर टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधतही रूग्णांना, नातेवाईकांना औषधे कुठे मिळतील याची माहिती उपलब्ध करुन देण्यात येत आहे. महत्त्वाचे म्हणजे यानंतरही एखाद्याला औषधे उपलब्ध होण्यास अडचण होत असेल तर थेट ’एफडीए’शी संपर्क साधण्याचे आवाहन ’एफडीए’ आयुक्त डॉ. पल्लवी दराडे यांनी केले आहे.

येथे संपर्क साधा
1800222365
022-26592362
022-26592363
022-26592364
022-26592365