आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ.अनिल रॉय यांची आयुक्तांकडे मागणी
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेत आरोग्य वैद्यकीय अधिकारी हे संविधानिक पद असल्याने वायसीएम रूग्णालयासह अन्य सर्व रूग्णालये आणि दवाखान्यांचा कार्यभार आपल्याकडे सोपवावा. तसेच रूग्णालयांकरिता उपकरणे, साहित्य, औषधे पुरवठा व खरेदीत सुसुत्रता येण्यासाठी आपल्याला अधिकार प्रदान करावेत, अशी मागणी महापालिकेतील आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ.के.अनिल रॉय यांनी केली आहे. याबाबत त्यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन दिले आहे. डॉ. के. अनिल रॉय यांच्याकडे 1 जून 2013 रोजी महापालिका आरोग्य वैद्यकीय अधिकारी या पदाचा भार सोपविण्यात आला होता.
डॉ.रॉय यांच्याकडे आठ रूग्णालये
सध्याच्या घडीला डॉ. अनिल रॉय यांच्याकडे आठ रूग्णालये आणि 27 दवाखान्यांचे नियंत्रण तसेच मध्यवर्ती साहित्य व औषध भांडार विभागाचे कामकाज सोपविण्यात आले होते. त्यानंतर 28 एप्रिल 2015 रोजी याच पदावर त्यांना पदोन्नती देण्यात आली होती. 24 ऑक्टोबर 2017 रोजी डॉ. रॉय यांच्याकडे असलेले रूग्णालयांकरिता उपकरणे, साहित्य, औषधे पुरवठा व खरेदीचे अधिकार रद्द करण्यात आले होते. 10 मे 2018 रोजी यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रूग्णालयासाठी स्वतंत्रपणे विभागप्रमुख म्हणून डॉ. पवन साळवे यांना ‘अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी’ घोषीत करण्यात आले आणि डॉ. रॉय यांच्याकडील रूग्णालयाचे अधिकार काढून घेण्यात आले. त्यानंतर 13 डिसेंबर 2018 रोजी वायसीएम रूग्णालयाचे विभागप्रमुख म्हणून डॉ. पद्माकर पंडीत यांची अधिष्ठाता पदावर नियुक्ती करण्यात आली.
हे देखील वाचा
औषधे वेळेवर उपलब्ध नाहीत
सरकारी योजना, राष्ट्रीय कार्यक्रम, क्षयरोग नियंत्रण, विवाहनोंदणी, यात्रा, शिबीरापासून मंत्र्यांच्या दौर्यातील वैद्यकीय सेवा याकरिता पथकाची नेमणूक, रूग्णवाहिका व्यवस्था वायसीएम रूग्णालयामार्फत केल्या जातात. मात्र, वायसीएम रूग्णालय स्वतंत्र विभाग म्हणून घोषीत केल्याने वैद्यकीय मुख्य कार्यालयामार्फत नियंत्रित केल्या जाणार्या सर्व कामकाजात व्यत्यय आला आहे. महापालिकेची सर्व रूग्णालये, दवाखाने एकाच अधिकार्याच्या अधिपत्याखाली असणे आवश्यक आहे. डॉ. रॉय यांच्याकडे असलेले रूग्णालयांकरिता उपकरणे, साहित्य, औषधे पुरवठा व खरेदीचे अधिकार रद्द केल्यानंतर उपकरणे, औषधे वेळेवर उपलब्ध झालेली नाहीत. निविदा प्रक्रीयाही वेळेत राबविल्या जात नाहीत. याचा विपरीत परिणाम रूग्णालयामार्फत दिल्या जाणार्या रूग्णसेवेवर होत आहे. मात्र, कोणतेही अधिकार नसताना लोकप्रतिनिधी तसेच नागरिकांमार्फत आपल्यालाच जबाबदार धरले जात आहे, असे रॉय यांचे म्हणणे आहे.
ठाणे पालिकेच्या धर्तीवर निर्णय घ्या
ठाणे महापालिकेतही वैद्यकीय विभागाअंतर्गत असणारी सर्व रूग्णालये दवाखाने, पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रम देखील ‘आरोग्य वैद्यकीय अधिकारी’ यांच्या नियंत्रणाखाली आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवड महापालिकेतही महाराष्ट्र महापालिका अधिनियमानुसार ‘आरोग्य वैद्यकीय अधिकारी’ पदाकडेच वैद्यकीय विभागाचे सर्वस्वी नियंत्रण असणे आवश्यक आहे, याकडे डॉ. रॉय यांनी लक्ष वेधले आहे.