रूग्ण असल्याचा बहाणा अन् अनेकांना घातला गंडा!

0

जळगाव । वृध्दास रिक्षात बसवून भर दुपारी लुटल्याची घटना उघडकीस आल्यानंतर रामानंदनगर पोलिसांनी चौघा संशयितांना अटक केली होती. दरम्यान, दिवसभर रिक्षात फिरून एखाद्याला गाठून त्यास पत्ता विचारण्याच्या बहाण्याने रिक्षात बसवायचे आणि रूग्ण असल्याचे भासवून हात चलाखीने पैसे गायब करण्याचा फंडा ही टोळी करत असल्याचा प्रकार पोलिसांच्या चौकशीत समोर आला आहे. यावेळी पोलिसांनी रिक्षासह 44 हजार रूपयांची रोकड या टोळीकडून हस्तगत केली आहे.

अशी घडली होती घटना
धीरज महारू राठोड, सिकंदर गफ्फार पटेल आणि सनी संजय बिर्‍हाडे यांसह एक महिलेने आदर्शनगरात जर्नादन पाटील यांना पत्ता विचारण्याच्या बहाण्याने रिक्षा बसवून हात चलाखीने त्यांचे एक लाख रूपये घेवून फरार झाले होते. त्यानंतर शुक्रवारी या चौघांना रामानंदनगर पोलिसांनी अटक केली. त्यांची कसून चौकशी करण्यात आल्यानंतर चौघांनी 44 हजार रूपये पोलिसांना काढून दिले आहे. यातच पोलिसांनी गुन्ह्यात वापरण्यात आलेली रिक्षा देखील जप्त केली आहे.

टोळीचा मोरक्या ‘ड्रामेबाज’
टोळीचा मोरक्या धीरज हा ड्रामेबाजपणा करण्यात पटाईत असल्याने प्रत्येक वेळेस नवीन टोळी तयार करून रस्त्याने पायी जात असलेल्या वृध्द किंवा महिला पादचार्‍यास जवळच असलेल्या ठिकाणाचाच पत्ता विचारायचा. त्यांनी पत्ता सांगितल्यावर रिक्षात बसवून त्या ठिकाणापर्यंत चालण्याची विनंती करायची. त्यांना रिक्षात बसवायचे. रिक्षात दोन ते तीन साथीदार आधीच बसलेले असायचे. त्यामध्ये महिलेचाही समावेश असायचा. तसेच रूग्ण असल्याचे भासविण्यासाठी धीरज हातात वेगवेगळ्या हॉस्पीटलांच्या फाईली असायच्या. यानंतर हळूच हात चलाखीने पादचार्‍यांकडील पैसे, सोने लुटायचा. कुणाला संशय येऊ नये यासाठी ‘फॅमिली ड्रामा’ अगोदर रिक्षात सेट करून ठेवायचा, अशी त्यांची गुन्ह्याची पध्दत असल्याची पोलिस चौकशीत समोर आली आहे.

पैश्यात चौघांचा हिस्सा
जर्नादन पाटील यांना लुटल्यानंतर चौघांनी आप-आपला हिस्सा वाटून घेतला होता. त्यात सिकंदर गफ्फार पटेल व सनी संजय बिर्‍हाडे यांच्यासह महिलेस प्रत्येकी 20 हजार रूपयांचा हिस्सा वाटून दिला तर टोळीचा मोरक्या धीरज महारू राठोड याने 40 हजार रूपये स्वत:कडे ठेवले. दरम्यान, धीरज याने हिस्स्यातील काही पैसे जुगारात हरल्याची माहिती समोर आली आहे. तर महिलेसह सिंकदर या दोघांनी पोलिसांनी चोरीचे पैसे काढून दिले आहेत. असे 44 हजार रूपये पोलिसांनी हस्तगत केले आहेत.