भूमीगत वीजवाहिन्यांची मागणी
रूपीनगर : रुपीनगर परिसरामध्ये अनेक ठिकाणी महावितरणच्या वीजतारा लोंबकळत आहेत. वाढत्या नागरिकरणाचा परिणाम म्हणून सर्वत्र घरांची तसेच इमारती वाढत आहेत. त्यामुळे येथील इमारतींवर, घरांवर अगदी हाताच्या अंतरावर या तारा लटकत आहेत. त्यामुळे अपघाताची दाट शक्यता दिसून येत आहे. यामुळे काही दुर्घटना घडण्याची शक्यता आहे. किरकोळ समजून महावितरण या प्रकाराकडे दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे या गोष्टींकडे गांभीर्याने लक्ष देऊन भूमिगत वाहिन्या टाकण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. भविष्यात घडणार्या अपघात आता टाळू शकतो. त्यासाठी महावितरण कंपनीने या तारा काढून टाकल्या पाहिजेत.
पिंपरी-चिंचवड शहरात सर्वत्र भूमिगत केबल टाकण्यात आले आहे. रूपीनगर परिसरातही अनेक सोसायट्यांमध्ये इन्फ्राच्या माध्यमातून भूमीगत केबल्स टाकण्यात आले आहेत. मात्र रुपीनगर येथील मुख्य रस्त्याच्या कडेला असलेल्या खांबावर अनेक तारा लटकलेल्या अवस्थेत दिसून येत आहेत. एकाच खांबावर अनेक कनेक्शन्स असल्याने येथे तारांचे जाळे तयार झाले आहे. या तारांच्या जवळ घरे असल्यामुळे अपघाताचा संभव आहे. गच्चीतून किंवा टेरेसमधून लहान मुलांचा हात पोहोचेल इतक्या जवळ या तारा आहेत.
प्रक्रीया चालू नाही
याबाबत येथील स्थानिक नगरसेवक प्रवीण भालेकर म्हणाले की, दोन वर्षांपूर्वीच रुपीनगरमधील अनेक सोसायट्यांमध्ये भूमिगत केबल कामे झाली आहेत. त्यानंतर अर्धवट राहिलेली कामे महावितरण कंपनीशी सातत्याने संपर्क साधण्याचा प्रयत्न करीत आहोत. मात्र अधिकार्यांनी अद्याप प्रक्रीया चालू झाली नसल्याचे सांगत आहेत. लवकरात लवकर ही कामे करणे गरजेचे आहे. अन्यथा दुर्घटना टाळू शकणार नाही.