पुणे । शैक्षणिक संस्थांमध्ये रॅगिंगसारखे प्रकार होऊ नये यासाठी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना आता रॅगिंगमध्ये सहभागी होणार नाही, अशा आशयाचे प्रतिज्ञापत्र ऑनलाईन भरून द्यावे लागणार आहे. याबाबत विद्यापीठ अनुदान आयोगाच्या सूचनेनुसार सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने सर्व महाविद्यालयांच्या प्राचार्यांना पत्रकाद्वारे कळविले आहे.
शैक्षणिक संस्थांच्या परिसरात रॅगिंगसारखे प्रकार घडतात. यामुळे विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागतो. तसेच संबंधित संस्थेची प्रतिमा देखील मलीन होते. याविरोधात युजीसीने उपाययोजना करण्यासाठी विद्यार्थ्यांकडून प्रतिज्ञापत्र घेण्याचा निर्णय घेतला आहे. संस्थेत प्रवेशित असलेल्या विद्यार्थ्यास प्रत्येक वर्षी ऑनलाईन पद्धतीने प्रतिज्ञापत्र सादर करावे लागणार आहे. रॅगिंगचे परिपत्रक सर्व महाविद्यालयांनी सूचनाफलकावर लावावे, अशी सूचना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास मंडळाने केली आहे.