रेंजहिल्स येथे आढळला दुतोंड्या मांडुळ जातीचा साप

0
पोलिसांनी दिले कात्रज सर्पोद्यानाच्या ताब्यात
खडकी : केंद्रीय कर्मचार्‍यांची वसाहत असलेल्या रेंजहिल्स येथिल लष्करी क्वार्टर्स परिसरात रविवारी (दि.7) रात्री पाच फुट लांबीचा मांडुळ जातीचा साप आढळला. लष्करी कर्मचार्‍यांनी मांडुळास पकडुन खडकी पोलिसांच्या स्वाधीन केले. पोलिसांनी त्यास कात्रज येथील सर्पोद्यानाच्या ताब्यात दिले. रेंजहिल्स येथिल क्यु.एम.टी.आय.शेजारी न्यु मंडेला लाईन लष्करी वसाहत आहे. येथिल वसाहतीमध्ये राहत असलेले लष्करी कर्मचारी नाईक भरत कांबळे यांना रविवारी रात्री 10.30 वाजता पाच फुट लांबीचा मांडुळ आढळुन आला. कांबळे व त्यांचे सहकारी मित्र अभिजीत शेलार, अक्षय केदारी, प्रविण कराळे, विशाल अंबोळीकर, प्रदिप रणदिवे व इतरांनी मांडुळ सापास पकडले.
अंधश्रद्धेपोटी बेसुमार तस्करी
नाईक कांबळे यांनी खडकी पोलिसांना या सापाबाबत माहिती दिली. पोलीस उपनिरिक्षक शिवाजी भोसले व पोलीस हवालदार सोपान अण्णा ठोकळ तेथे आले. त्यांनी मांडुळ साप ताब्यात घेऊन त्यास रात्री 12 वाजता कात्रज सर्पोद्यानाच्या ताब्यात दिले. काळ्या पिवळसर अशा रंगाचा या मांडुळ सापाची लांबी साधारपणे पाच फुट असल्याचे पोलिसांनी सांगितले. बिन विषारी व दोन तोंड असलेल्या या सापास दुतोंड्या नावाने ओळखले जाते. मऊ मातीमध्ये हा साप आढळतो. पावसाळ्यात त्याचे बाहेर पडण्याचे प्रमाण अधिक असते. सरडे, घुशी उंदीर व पक्षी त्याचे खाद्यपदार्थ आहे. हा साप गुप्तधनाचा शोधक असलेल्या अंधश्रध्देपोटी व इतर गैरसमजुतींमुळे या सापाची बेसुमार तस्करी सुरु आहे. मांडुळाचे वजन यावर त्याचे दर ठरवले जातात. एका मांडुळाची किंमत काही लाखाच्या घरात असते. हा साप बिनविषारी जरी असल्याने काही त्रास नसतो. मात्र गुप्तधन मिळवून देतो म्हणून त्याची खरेदी करणारे खूप लोक असतात. त्यामुळे या सापाबाबत अनेक गैरसमज, अंधश्रद्धा समाजात फोफावलेली दिसते.