रेआल माद्रिदचा सोसियेदादवर विजय

0

माद्रिद । रेआल माद्रिदच्या गॅरेथ बेलने आपल्या टीकाकारांना जोरदार चपराक मारताना रेआल सोसियेदादविरुद्धच्या सामन्यात गोल करून संघाला 3-1, असे विजयी करण्यात मोलाची भूमिका बजावली. या विजयामुळे रेआल माद्रिदचा संघ गुणतालिकेत चौथ्या क्रमांकावर आला असून आघाडीवर असलेल्या बार्सिलोनाच्या तुलनेत चार गुणांनी पिछाडीवर आहे.

मागील काही सामन्यांमध्ये पोर्तुगालचा आघाडीचा फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या गैरहजेरीत गोल करण्यात अपयशी ठरलेल्या बेलचा गोल या सामन्यात संघाला विजयी करण्यात निर्णायक ठरला. पहिल्या हाफमध्ये रेआल माद्रिदचा संघ 2-1 असा आघाडीवर होता. गतविजेत्या रेआल माद्रिदसाठी पहिला गोल बोर्झा मायोरालने केला. या गोलमुळे रेआल माद्रिदने दिग्गज फुटबॉलपटू पेले यांच्या टिम सांतोसच्या 1960 दशकात सलग 73 सामन्यांमध्ये गोल करण्याच्या विक्रमाशी बरोबरी केली. अन्य एका सामन्यात विलारीयालने अल्वावेसला 3-0 असे हरवून गुणतालिकेत तळाच्या स्थानावर ढकलून दिले. चेल्सीचा माजी स्ट्रायकर रेमीने केलेल्या गोलाच्या जोरावर लास पाल्म्सने अ‍ॅथलेटिको बिलबाओवर 1-0, असा विजय मिळवला.