माद्रिद । फुटबॉलमधील दिग्गज खेळाडू क्रिस्टीयानो रोनाल्डोवरच संघ अवलंबून नसल्याचे रेआल माद्रिदने बुधवारी रात्री बार्सिलोनाविरुद्धच्या सामन्यात दाखवून दिले आहे. स्पॅनिश सुपर कपच्या निर्णायक लढतीत रेआल माद्रिदने स्टार खेळाडूंचा समावेश असलेल्या बार्सिलोनाला 2-0 असे हरवत विजेतेपदावर नाव कोरले, बार्सिलोनाचा स्टार खेळाडू लियोनेल मेस्सी आणि सुआरेझला ही बार्सिलोनाचा पराभव टाळता आला नाही. या सामन्यात रेआल माद्रिदने पूर्णत: वर्चस्व राखले. पहिल्या सत्रातील चौथ्या मिनीटालाच मार्कोे असेंसिआने गोल करत रेआल माद्रिदला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. त्यानंतर 38 व्या मिनीटाला करीम बेंजेमाने गोल करत संघाला विजयाच्या जवळ नेले. दुसरीकडे पूर्ण सामन्यात बार्सिलोनाच्या खेळाडूंचा आक्रमकपणा पहायला मिळाला नाही. बहुतेक वेळा गोल वाचण्यासाठी बार्सिलोनाचे खेळाडू प्रयत्न करत असल्याचे पहायला मिळाले.
रॉयल स्पॅनिश फुटबॉल महासंघाने सामनाधिकार्यांना धक्काबुकी केल्यामुळे क्रिस्टीयानो रोनाल्डोवर पाच सामन्यांच्या बंदीची कारवाई केली आहे. याशिवाय रोनाल्डोवर 4,500 डॉलर्सचा दंडही ठोठावण्यात आला आहे. या कारवाईच्या विरोधात दाद मागण्यासाठी रोनाल्डोला 10 दिवसांची मुदत देण्यात आली होती. मात्र स्पॅनिश फुटबॉल महासंघाने रोनाल्डोचे अपील फेटाळल्याचे बुधवारी जाहीर केल्यामुळे त्याला या सामन्यात खेळता आले नाही.