रेखा, सचिनला मल्ल्यांप्रमाणे राज्यसभेतून निलंबित करा

0

नवी दिल्ली । राज्यसभेच्या कामकाजाला वारंवार गैरहजर राहणारा विक्रमादित्य क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर आणि अभिनेत्री रेखा यांचे सदस्यत्व निलंबित करण्याची मागणी समाजवादी पक्षाचे खासदार नरेश अग्रवाल यांनी करून खळबळ उडवून दिली आहे. या दोन्ही मान्यवरांचे राज्यसभेतील कामकाजापेक्षा जाहिरातींवर जास्त लक्ष असल्याचा आरोपदेखील त्यांनी केला.

नरेश अग्रवाल संतापले
राज्यसभेवर कला, साहित्य, विज्ञान, सामाजिक, चित्रपट अशा विविध क्षेत्रातील 12 सदस्यांमध्ये रेखा, सचिन तेंडुलकर, अनु आगा, संभाजी छत्रपती, स्वपन दासगुप्ता, रूपा गांगुली, नरेंद्र जाधव, मेरी कोम, के पारासरन, गोपी सुरेश, सुब्रमण्यम स्वामी आणि केटीएस तुलसी यांचा समावेश आहे. सचिन आणि रेखा हे अनेकदा सभागृहात गैरहजर असल्याने या पार्श्‍वभूमिवर सचिन तेंडुलकर आणि अभिनेत्री रेखा यांच्या राज्यसभेतील अनुपस्थितीवरून मंगळवारी राज्यसभेत खासदार नरेश अग्रवाल यांनी आक्रमक पवित्रा घेतला. सचिन आणि रेखा यांना सभागृहात यायचंच नसेल तर या दोघांनी स्वतःहून राजीनामा द्यावा किंवा त्यांना सभागृहानं निलंबित करावं, असं अग्रवाल यांनी म्हटलं. विशेष म्हणजे अग्रवाल यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनातही या दोघांच्या अनुपस्थितीचा मुद्दा मांडला होता. आता तर त्यांनी विजय माल्ल्या यांच्याप्रमाणे निलंबित करावे अथवा त्यांनी राजीनामा द्यावी ही मागणी केली.

दांडी आधीदेखील वादात

2012 पासून राज्यसभेत 348 दिवसांपैकी सचिन केवळ 23 दिवस हजर राहिला असून रेखा यांनी फक्त 18 दिवस सभागृहात हजेरी लावली आहे. पावसाळी अधिवेशनातही या दोघांनी दांडी मारली. गेल्यावर्षी 31 जानेवारी 2017 ते 9 फेब्रुवारी 2017 रोजी झालेल्या बजेट सेशनमध्ये हे दोघेही केवळ एक-एक दिवस उपस्थित होते. राज्यसभेच्या कामात रस नसेल तर त्यांनी पदाचा राजीनामा द्यावा दोन्ही मान्यवर सभागृहात उपस्थित नसले तरी जाहिरात चमकत असल्याबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली.