रेडझोनचा प्रश्न मार्गी लावणार; सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार यांचा विश्वास

0

भोसरीदिघीवडमुखवाडीतळवडेरूपीनगरचिखलीमोशी परिसरातील हजारो घरांवर रेड झोनची टांगती तलवार

पिंपरी चिंचवड : पिंपरी-चिंचवड शहरातील रेड झोनचा प्रश्न केंद्रातील भाजप सरकारच मार्गी लावणार आहे. या संदर्भात नवी दिल्लीत संरक्षण मंत्र्यांची अनेकदा भेट घेऊन पाठपुरावा केला आहे. हा प्रश्न लवकरच मार्गी लागण्याची शक्यता आहे, असा विश्वास पिंपरी-चिंचवड महापालिकेचे सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी व्यक्त केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे शिरूरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी तब्बल ३ महिन्यांनतर पिंपरी-चिंचवड महापालिकेत पाऊल ठेवले. त्यावेळी त्यांनी पालिका सत्ताधारी व प्रशासनावर टीका केली. त्याला उत्तर देताना पवार बोलत होते.

केंद्रीय मंत्र्यांकडे पाठपुरावा…

एकनाथ पवार म्हणाले की, पूर्वी पिंपरी-चिंचवड शहराचा भाग बारामती लोकसभा मतदार संघात होता. त्यावेळी खासदार म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी प्रतिनिधीत्व केले आहे. ते स्वत:ला जाणता राजा म्हणून घेतात. त्यांना रेड झोनचा प्रश्न सोडविता आला नाही. हे त्याचे अपयश आहे. भोसरी, दिघी, वडमुखवाडी, तळवडे, रूपीनगर, चिखली, मोशी या परिसरातील हजारो घरांवर रेड झोनची टांगती तलवार आहे. रेड झोनचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींनी दिल्लीत संरक्षण मंत्र्यांसोबत अनेकदा बैठका घेऊन चर्चा केली आहे. तत्कालिन संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर, निर्मला सितारामन यांच्याशी अनेकदा चर्चा करीत त्यावर पाठपुरावा कायम ठेवला आहे. आताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्याशी लवकरच भेट घेणार आहोत. त्यासंदर्भात संरक्षण मंत्री सकारात्मक आहेत. बोपखेल पुलाचा प्रश्न ज्या प्रमाणे मार्गी लावला आहे. त्याप्रमाणेच हा प्रश्न लवकरच सोडवला जाईल, असा विश्वास एकनाथ पवार यांनी व्यक्त केला.

राष्ट्रवादीने ठेकेदार पोसले…

पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटीत संचालक मंडळाच्या चर्चेतून निर्णय घेतले जातात. नियमानुसार निविदा प्रकिया राबवून प्रकल्प सुरू केले गेले आहेत. त्यामुळे तिसर्‍या टप्प्यात समावेश होऊनही शहर १९ व्या क्रमांकावर आले आहे. त्यामुळे स्मार्ट सिटीचे काम योग्य दिशेने सुरू असल्याचे सिद्ध होते. राष्ट्रवादीच्या सत्ताकाळाप्रमाणे पालिकेत ठेकेदार पोसण्याचे काम केले जात नसून, त्यांच्याकडून वेळेत काम करून घेतले जात आहे. त्यामुळे अनेक योजना व प्रकल्प मार्गी लागत आहेत, असा विश्वास एकनाथ पवार यांनी व्यक्त केला.