रेडझोन संघटनेचे देहूत साखळी उपोषण

0

देहूरोड । देहूरोड तसेच दिघी, भोसरी, तळवडे या भागातील रेडझोन रद्द करण्यात यावा, या प्रमुख मागणीसह विविध मागण्यांसाठी रेडझोन संघर्ष समितीच्या कार्यकर्त्यांनी देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या कार्यालयासमोर सोमवारपासून लाक्षणिक साखळी उपोषण सुरू केले आहे. वेळ पडल्यास दिल्लीतही आंदोलनाची आता तयारी करावी लागणार असल्याचा सूर यावेळी कार्यकर्त्यांकडून व्यक्त करण्यात आला.येथील दारूगोळा कोठारामुळे लागू करण्यात आलेला रेडझोन रद्द करावा, त्याचबरोबर अन्य मागण्यांसाठी रेडझोन संघटनेचे सर्व कार्यकर्ते सकाळी बाजारपेठेतील सुभाष चौकात जमले. तेथून रेडझोन हटावच्या घोषणा देत अबुशेठ रस्ता रेल्वेस्थानक मार्गे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या कार्यालयासमोर आले.रेडझोन संघर्ष समितीचे अध्यक्ष सुदाम तरस, मदन सोनिगरा, यदुनाथ डाखोरे, गणेश चव्हाण, धर्मपाल तंतरपाळे, कांतीलाल काळोखे, देहूच्या सरपंच उषा चव्हाण, पिंपरी चिंचवडचे नगरसेवक पंकज भालेकर, नगरसेविका संगिता भोंडवे, देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाचे उपाध्यक्ष विशाल खंडेलवाल, गोपाळ तंतरपाळे, अ‍ॅड. कैलाश पानसरे, अ‍ॅड. कृष्णा दाभोळे, डॉ. श्रीप्रकाश गलांडे आदींसह संस्थेचे पदाधिकारी, कार्यकर्ते, व्यापारी आणि शेतकरी यावेळी उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांनी रेडझोनला कडाडून विरोध करणारी मते व्यक्त केली.

उपोषणकर्त्यांच्या प्रमुख मागण्या
रेडझोनसंबंधी अधिसूचना रद्द करावी, नव्याने अधिसूचना काढण्यात यावी. त्याची अंतर मर्यादा संरक्षण खात्याच्या एसटीइसी समितीच्या निर्देशानुसार 270 मीटर ठेवण्यात यावी, नव्याने काढल्या जाणार्‍या अधिसूचनेनुसार बाधीत मिळकतधारक व शेतकरी यांना नवीन भूमीअधिग्रहण कायद्यानुसार मोबदला देण्यात यावा, वर्क्स ऑफ डिफेन्स अ‍ॅक्टमधील तरतुदीप्रमाणे कोणत्याही रेडझोनबाधीत शेतकर्‍याला शेती करण्यास निर्बंध लादू नयेत. त्याला शेती करण्याची मुभा द्यावी, शेतकर्‍यांच्या सात-बारावरील रेडझोनचा शेरा किंवा शिक्का रद्द करण्यात यावा.