रेडिमेड स्टोअर्स चोरीप्रकरणी गुन्हा दाखल

0

भुसावळ: शहरातील लोखंडी पूलाजवळील देवडा रेडीमेड या दुकानात झालेल्या चोरी प्रकरणी येथील शहर पोलिस ठाण्यात बुधवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला. शहर पोलिस ठाण्याच्या हद्दितील आणि बाजारपेठ पोलिस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या संदीप देवडा यांच्या देवडा रेडीमेड या दुकानात गेल्या महिन्यात 22 ऑक्टोबरला चोरी झाल्यानंतर महिनाभराच्या अंतराने पुन्हा चोरट्यांनी दुकानाच्या छतावरील पत्रे वाकवून पीओपी तोडत दुकानात चोरी केली होती. शनिवार, 23 रोजी सकाळी दुकान उघडल्यानंतर ही चोरी लक्षात आल्यानंतर शहर पोलिसांना माहिती कळवण्यात आली होती.

चोरट्यांनी दुकानातील 500 रुपयांच्या रोकडसह स्वेटर, बनियन, मोजे, टी शर्ट आदी कपडे लांबवल्याप्रकरणी दुकानाचे व्यवस्थापक संदीप देवडा यांनी बुधवारी सायंकाळी शहर पोलिस ठाण्यात 16 हजार 785 रुपयांच्या मालाची चोरी झाल्याप्रकरणी तक्रार दिल्यावरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस निरीक्षक बाबासाहेब ठोंबे यांनी चोरी प्रकरणी देवडा यांच्याकडून माहिती जाणून घेतली.