‘रेड ट्यूब’ देण्याच्या आमिषाने पुजार्‍याला गंडवले

भुसावळ : राशीभोवती लागलेली साडेसाती संपवण्यासाठी जुन्या रेडिओतील रेड ट्यूब देण्याच्या बहाण्याने बिहारातील पुजार्‍याला तब्बल एक लाख 90 हजारात गंडवण्यात आल्याची घटना भुसावळात घडली. या प्रकरणी मुक्ताईनगर तालुक्यातील मोरझिरा येथील तिघांविरुद्ध शुक्रवारी मध्यरात्री भुसावळ बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

परीचयातील व्यक्तीच्या संपर्कातून आरोपींनी गंडवले
तक्रार सुबोध संतोषी राय (49, ग्रामीण बँकेजवळ, सोनो, जि.जमुई, बिहार) हे बिहार राज्यात राहतात शिवाय ते पूजारी आहेत. राशीला लागलेली साडेसाती दूर करण्यासाठी जुन्या रेडिओतील ‘रेड ट्यूब’ गुणकारी तिची पूजा केल्याने साडेसाती दूर होत असल्याची माहिती त्यांना मिळाली होती व आपल्या परीचयातील व्यक्तीने ही ‘रेड ट्यूब’ मुक्ताईनगर तालुक्यातील मोरझिरा येथील आरोपींकडे असल्याची माहिती दिली होती. आरोपींशी तक्रारदाराने संपर्क साधल्यानंतर भुसावळात आरोपींनी भेटीचा दिवस निश्‍चित केला. 23 मार्च 2021 रोजी तक्रारदार भुसावळात आल्यानंतर आरोपींनी त्यांच्याकडील एक लाख 90 हजारांची रक्कम उकळली मात्र ‘रेड ट्यूब’ दिली नाही व आपली फसवणूक झाल्यानंतर त्यांनी बाजारपेठ पोलिस ठाण्यात तक्रार दिला. तक्रार अर्जावर सखोल चौकशी करण्यात आल्यानंतर शुक्रवारी मध्यरात्री दोन वाजेनंतर तीनही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपी पंकज रतनसिंग चव्हाण यास शुक्रवारी पोलिसांनी अटक केली तर अन्य दोन संशयीतांचा कसून शोध सुरू आहे.

या आरोपींविरुद्ध दाखल झाला गुन्हा
पूजारी सुबोध संतोषी राय (49, ग्रामीण बँकेजवळ, सोनो, जि.जमुई, बिहार) यांच्या फिर्यादीनुसार शुक्रवारी मध्यरात्री आरोपी दिनेश उर्फ सचिन आत्माराम राठोड, राजू उर्फ राहुल दगडू जाधव, पंकज रतनसिंग चव्हाण, (सर्व रा.मोरझिरा, ता.मुक्ताईनगर) यांच्याविरुद्ध गुरनं.166/2021, भादंवि 420 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.निरीक्षक कृष्णा भोये करीत आहेत.

श्रीमंत होण्याच्या लालसेने फसवणुकीचे अनेक प्रकार
श्रीमंत होण्यासह आयुष्यातील अडचणी दूर होण्याचा विश्‍वास देवून भामटे युट्यूबवर सुलेमानी पथ्थर, काळी हळद, नागमणी, करंटवाले काश्याचे भांडे, शंख, मांडूळ याचे फायदे टाकून संपर्क क्रमांकही देतात. अंधश्रद्धेला बळी पडलेले लोक मग मुंंबई, पुण्यासह अनेक राज्यातून आरोपींच्या संपर्कात येतात व त्यासाठी भेटीचा कालावधी निश्‍चित होतो मात्र आरोपींकडे यापैकी कुठलीही वस्तू नसते केवळ लुटीच्या इराद्याने रात्रीच्या वेळी जंगलात बोलावून नंतर मारहाण करून संबंधिताना लुटण्यात आल्याची घटना मुक्ताईनगर तालुक्यात घडल्या आहेत शिवाय याबाबत अनेक गुन्हेदेखील दाखल आहेत.
आरोपींना अटक झाली तरी ने नंतर जामिनावर सुटतात व तेच प्रकार करीत असल्याचे दिसून येते. नागरीकांनी अशा फसव्या जाहिरातींना बळी पडू, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.