रेमडेसीव्हरची ब्लॅकमध्ये विक्री प्रकरणात तिसरा आरोपीही जाळ्यात

भुसावळ : कोरोना रुग्णांसाठी लागणार्‍या रेमडेसीव्हर इंजेक्शनची तब्बल 20 ते 25 हजारात ब्लॅकमध्ये विक्री करणार्‍या दोघांच्या बाजारपेठ पोलिसांनी बुधवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास बद्री प्लॉटमधील ओम पॅथालॉजीमधून मुसक्या आवळल्या होत्या. पोलिसांनी या गुन्ह्यात तिसर्‍या आरोपीलाही शुक्रवारी अटक केली. राहुल चुडामण रजाणे (32, गोलाणी, साईनगर, गोलाणी कॉम्प्लेक्स, भुसावळ) असे त्याचे नाव आहे. शुक्रवारी आरोपीला न्यायालयात हजर केले असता त्यास 25 एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

अनेक मासे अडकण्याची शक्यता
भुसावळातील ओम पॅथालॉजीत 20 ते 25 हजार रुपये दराने रेमडेसीव्हरची विक्री होत असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी लॅब चालक विशाल शरद झोपे (28, बद्री प्लॉट, भुसावळ) व कर्मचारी गोपाळ नारायण इंगळे (18, मानमोडी, ता.बोदवड) यांना बुधवारी अटक केली शिवाय त्यांच्याकडून 19 हजार 600 रुपये किंमतीचे चार इंजेक्शन जप्त केले होते. आरोपींना गुरुवारी न्यायालयात हजर केल्यानंतर त्यांना तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली तर चौकशीदरम्यान राहुल चुडामण रजाणे (32, गोलाणी, साईनगर, गोलाणी कॉम्प्लेक्स, भुसावळ) या आरोपीचे नाव पुढे आल्यानंतर त्यास शुक्रवारी अटक करण्यात आली. रजाणे यासदेखील आता 25 एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली. या गुन्ह्यात आणखी काही आरोपींना लवकरच अटकेची शक्यता असून रेमडेसीव्हरचा पुरवठा करणारे मुख्य संशयीतही लवकरच अटक होतील, असे सूत्रांनी सांगितले. तपास पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.