रेल्वेकडून पर्यायी जागा देण्याची रहिवाशांची मागणी

0

निंभोरा । येथील रेल्वे उड्डाणपूल व रस्ता उभारणीसाठी या परिसरातील रहिवाशी बेघर होणार असून या रहिवाशांना पर्यायी जागा व मोबदला शासनाने आधी या गरीब कुटुंबांना देऊन प्रश्न सोडवावा व पूल व रस्ता उभारणी करावी अशी मागणी येथील रहिवाशांनी रेल्वे विभागाकडे निवेदन व हरकत घेऊन केली आहे. याबाबत निंभोरा रेल्वे स्टेशन रेल्वे गेटजवळ व परिसरात रेल्वे उड्डाण पूल व रस्ता उभारणीसाठी दुसर्‍यांदा या परिसरातील शेतकर्‍यांच्या व रहिवाशांच्या जागेची मोजणी होत असून या बाबत 26 शेती व जागा संबधीतांना मोजणी संदर्भात सूचना पत्र मिळाले असून ही मोजणी 8 ऑगष्ट रोजी होत असल्याची समजते. याबाबत भूमी अभिलेख व संबधीत विभागाकडून सर्वांना पत्र देण्यात आले असल्याने ही मोजणी पोलीस बंदबस्तोत होणार आहे.

50 वर्षापासून राहणार्‍यांना पर्यायी जागा द्यावी
पूल उभारणीत गेल्या 50 वर्षापेक्षा अधिक वर्षापासून खाजगी जागेत अनेक गरीब कुटुंब भाडेकरू म्हणून घर उभारून राहत आहे यांना ग्रामपंचायत पाणी पुरवठा तसेच विज वितरण कंपनीद्वारे विद्युत पुरवठा व सर्व सुविधा देत आहे. गेल्या 50 वर्षापेक्षा जास्त दिवसापासून खाजगी जागेत भाडे तत्वावर स्वखर्चाने घराची उभारणी करून ते राहत आहे.

ग्रामपंचायत प्रशासनाकडे नोंद
याबाबत ग्रामपंचायतकडे देखील नोंद आहे व रहिवाशांकडे देखील भाडेकरू असल्याचे कागदपत्रांचे पुरावे माहिती आहे या शिवाय ते भूमिहीन आहे. त्यामुळे या रहिवाशांची जागा पुल व रस्ता उभारणीत गेल्यास ते बेघर होणार असल्याने शासनाने या संबधीत जागा धारकांबरोबरच राहणार्‍या कुटुंबांना पर्यायी जागा व मोबदला द्यावा अशी मागणी व हरकत गेल्या काही दिवसांपासून जिल्हाधिकारी, सार्वजनिक बांधकाम उत्तर विभाग, प्रांताधिकारी फैजपूर, तहसीलदार आदींना निवेदन देऊन रहिवाशांनी मागणी केली आहे.