भुसावळ : तालुक्यातील साकेगाव कॅबीनजवळ दोन वर्षीय चिमुकलीसह पती-पत्नीने धावत्या रेल्वेखाली आत्महत्या केली. बुधवारी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. मृतांमध्ये रेल्वेतील कर्मचारी हरीष शिरीष चौधरी (36) त्यांच्या पत्नी जयश्री हरीष चौधरी (27) व या दाम्पत्याची कन्या गुंजन हरीष चौधरी (2 वर्ष) यांचा समावेश आहे. दरम्यान, या दाम्पत्याने आत्महत्या केली की रेल्वे रूळ ओलांडताना त्यांचा मृत्यू झाला याबाबतचा तपास भुसावळ तालुका पोलिसांकडून सुरू आहे. जळगाव जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनानंतर पती-पत्नीवर रात्री उशिरा अंत्यसंस्कार करण्यात आले.
तिघांच्या मृत्यूने साकेगावात हळहळ
रेल्वेतील कर्मचारी हरीष यांचे साकेगावातील वाघोदे गल्लीत घर असून ते सध्या मात्र भुसावळातील मोहित नगरात वास्तव्यास आहेत. चौधरी दाम्पत्य त्यांच्या कन्या गुंजनला घेवून रेल्वे रूळाजवळ गप्पा मारत बसल्याचे अनेकांनी पाहिले तर त्याच्या काहीच वेळानंतर तिघांचा रेल्वेखाली मृत्यू झाल्याची बाब कळताच साकेगावकरांनी तसेच घटनास्थळी भुसावळ तालुक्याचे निरीक्षक रामकृष्ण कुंभार, सहाय्यक निरीक्षक अमोल पवार, विजय पोहेकर व लोहमार्ग पोलिसांनी धाव घेतली. डाऊन लाईनीवरील खांबा क्रमांक 223 जवळ जयश्री व त्यांची कन्या गुंजनचा मृतदेह आढळला तर काही अंतरावर हरीष अत्यवस्थ अवस्थेत असल्याचे आढळल्याने त्यांना तातडीने गोदावरी रुग्णालयात हलवण्यात आले असता उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.
आत्महत्या की अपघात? पोलिसांकडून कारणांचा शोध
पोलिसांना घटनास्थळाजवळ हरीषची दुचाकी (एम.एच.19 ए.वाय.6511) आढळली तर या दाम्पत्याला गप्पा मारतानाही अनेकांनी पाहिल्याचे सूत्रांनी सांगितले त्यामुळे अचानक या दाम्पत्याने आत्महत्या का केली? हे न उलगडणारे कोडे आहे तर रेल्वे रूळ ओलांडताना या दाम्पत्याचा मृत्यू झाल्याचा कयास वर्तवला जात आहे. या प्रकरणी उपस्टेशन प्रबंधकांच्या खबरीनुसार भुसावळ तालुका पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. रेल्वेच्या धडकेने या दाम्पत्याचा मृत्यू झाल्याचे त्यात नमूद करण्यात आले आहे. तपास सहाय्यक निरीक्षक अमोल पवार करीत आहेत.