रेल्वेखाली येऊनही महिला बचावली

0

जळगाव । जळगाव रेल्वेस्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर भुसावळ-नाशिक पॅसेंजरमध्य चढत असतांना अचानक वृध्द महिलेचा पाय घसरला आणि ती महिला रेल्वेखाली अडकली. मात्र, क्षणातच रेल्वे थांबल्याने वृध्द महिलेस लोहमार्ग पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने बाहेर काढण्यात आले. ही घटना गुरूवारी सायंकाळी 5.45 वाजेच्या सुमारास घडली. सुमनबाई रोहिदास जाधव (वय-60 रा. बोडरे ता. चाळीसगाव) असे जखमी वृध्द महिलेचे नाव आहे. या अपघात वृध्द महिलेच्या पायाला गंभीर दुखापत झाली असल्याने तिला तात्काळ पोलिसांनी जिल्हा सामान्य रूग्णालयात उपचारार्थ हलविण्यात आले आहे.

खटल्याच्या कामानिमित्त जळगावात
चाळीसगाव तालुक्यातील बोडरे येथील रोहिदास हरचंद जाधव हे पत्नी सुमनबाई व मुलासोबत न्यायालयीन तारीख असल्यामुळे गुरूवारी सकाळी जळगावात आले होते. न्यायालयीन काम आटोपल्यानंतर सायंकाळी जाधव कुटूंबिय घरी परतण्यासाठी रेल्वे स्थानकावर आले होते. सायंकाळी 6.45 वाजेच्या सुमारास रेल्वेस्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रं.1 वर भुसावळ-नाशिक पॅसेंजर आल्यानंतर जाधव कुटूंबिय त्यात चढत होत होते. मात्र, सुमनबाई यांचा रेल्वेत चढत असताना अचानक पाय घसरला. त्यात रेल्वे देखील सुरू झाली. पाय घसरताच त्या रेल्वेखाली आल्या. ही घटना कळताच रेल्वे थांबविण्यात आली.

महिलेच्या पायाला गंभीर दुखापत
वृध्द महिला रेल्वेखाली आल्याची माहिती लोहमार्ग पोलिस योगेश चौधरी, भारत पवार, अडकणे यांना मिळताच त्यांनी रेल्वेस्थानकावर धाव घेतली. त्या ठिकाणी प्रवाश्यांनी गर्दी चांगलीच गर्दी केली होती. रेल्वेखाली आल्याने मात्र, वृध्द महिलेच्या पायाला गंभीर दुखापत झाली होती. रेल्वेखाली अडकलेल्या वृध्द महिलेस पोलिसांनी कसे-बसे वृध्द बाहेर काढले. त्यानंतर लोहमार्ग पोलिस कर्मचारी योगशे चौधरी यांनी तात्काळ 108 क्रमांकाची रूग्णवाहिका बोलवून घेत वृध्दास त्यात बसविले. उपचारार्थ जिल्हा सामान्य रूग्णालयात नेले.