रेल्वेचा ट्रॅफिक जाम : भुसावळ विभागात खोळंबल्या तब्बल 30 गाड्या

0

नागपूरमार्गे 16 गाड्या वळवल्याने इटारसी मार्गावरील ट्रॅफिक झाली कमी

भुसावळ : लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या परप्रांतीयांना घरी जाण्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या पुढाकारातून ठिकठिकाणाहून गाड्या सोडल्या जात आहेत मात्र शुक्रवारी एकाचवेळी सोडण्यात आलेल्या गाड्यांमुळे गुरुवारी रात्रीपासून रेल्वे मार्गावर ट्रॅफिक वाढल्याने भुसावळ विभागात तब्बल 30 गाड्या खोळंबल्याने रणरणत्या उन्हात प्रवाशांचे जेवणासह पाण्यासाठी चांगलेच हाल झाले. दरम्यान, नागपूरमार्गे 16 गाड्या वळवण्यात आल्यानंतर इटारसी मार्गावरील ट्रॅफिक कमी झाली.

भुसावळ ते इटारसीदरम्यान वाहतूक ठप्प
परप्रांतीय प्रवाशांसाठी सोडण्यासाठी विशेष श्रमिक रेल्वे गाड्या सोडण्यात आल्या होत्या मात्र मध्य प्रदेशासह उत्तर प्रदेशाकडे निघालेल्या या गाड्यांपैकी इटारसी रेल्वे स्थानकावर गुरुवारी रात्री गाडी थांबल्यानंतर या गाडीच्या मागून येणार्‍या गाड्यांना आपसुकच अन्य रेल्वे स्थानकांवर थांबवण्याची वेळ आल्याने प्रवाशांची चांगलीच गैरसोय व संतापही झाला.
इटारसी, खंडवा तसेच भुसावळ, जळगाव पर्यंत विविध रेल्वे स्थानकावर 30 गाड्या तास न् तास थांबून असल्याने प्रवासी चांगलेच संतप्त झाले होते. भुसावळ जंक्शनवर थांबलेल्या गाडीतील प्रवाशांना रेल्वे प्रशासनातर्फे पाण्याच्या बाटल्या आणि जेवण देण्यात आल्याचे सांगण्यात आले.

दातृत्वाचा ‘निर्मल’ झरा पुन्हा पाझरला
जेथे कमी, तेथे आम्ही म्हणीप्रमाणे सुमारे दोन महिन्यांपेक्षा अधिक काळापासून शहरातील वंचित, गरजू तसेच परप्रांतीयासाठी अन्नछत्र उभारणार्‍या नगरसेवक तथा साईसेवक पिंटू कोठारी यांना आऊटरला दोन रेल्वे गाड्या उभ्या असल्याची व प्रवाशांची जेवणासाठी गैरसोय होत असल्याची माहिती कळाल्यानंतर त्यांनी 400 पुरी-भाजीची पाकिटे, 300 डझन केळी तसेच 90 किलो तांदूळाची खिचडी आणि तब्बल 110 गार पाण्याचे जार घेऊन कार्यकर्त्यांसह आऊटर गाठले. गाडीतील लहान बालकांना बिस्कीटाच्या पुड्यांचे वाटप करण्यात आले. जेवण व थंड पाणी उपलब्ध झाल्याने परप्रांतीय प्रवाशांनी कोठारी यांच्या दातृत्वाचे तोंड भरून कौतुक करीत त्यांना आशीर्वादही दिले.