नवीन प्लॅटफार्मला तिसरी लाईन जोडण्याचे काम वेगात
भुसावळ- रेल्वे स्थानकावरील प्लॅटफार्म क्रमांक नऊ व 10 ला जोडण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू असून त्यासाठी रेल्वे प्रशासनाने 28 पॅसेंजर गाड्या रद्द केल्या असून अनेक गाड्यांचा मार्गात बदल केला आहे शिवाय रेल्वे स्थानकावर येणार्या गाड्यादेखील यार्डात थांबवल्या जात आहेत. रविवारीदेखील काशी, बरेली, पुष्पक, कर्नाटक व जोधपूर या गाड्यांना रेल्वे स्थानकासह सेक्शनमध्ये सुमारे सव्वा तीन तास थांबविण्यात आल्याने रेल्वे प्रवाशांचे रणरणत्या उन्हात चांगलेच हाल झाले.
सव्वा तीन तासांच्या ब्लॉकने प्रवासी त्रस्त
प्लॅटफार्म क्रमांक नऊ व दहाचे काम वेगात सुरू असल्याने या कामासाठी रविवारी सुमारे सव्वा तीन तासांचा ब्लॉक घेण्यात आला. यासाठी तब्बल पाच गाड्या रेल्वे स्थानकासह यार्डात थांबवून ठेवण्यात आल्या. 8 ते 19 एप्रिलदरम्यानदेखील हा ब्लॉक दररोज घेण्यात येणार असल्याचे रेल्वे सूत्रांनी सांगितले. रेल्वे यार्डातदेखील कामे सुरू असल्याने ब्लॉक घेतला जात असल्याने जळगावकडे जाणार्या गाड्या रेल्वे स्थानकावर थांबवून ठेवण्यात येत असल्याने प्रवाशांचे ऐन उन्हाळ्यात हाल होत आहेत. रविवारी काशी एक्स्प्रेस, बरेली एक्स्प्रेस, पुष्पक एक्स्प्रेस, जोधपूर एक्स्प्रेस, कर्नाटक एक्स्प्रेस या गाड्या थांबविण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.