उद्यान एक्सप्रेसमुळे झाला अपघात
कामशेत : कामशेत जवळील नायगावच्या हद्दीत बंगलोरहुन मुंबईकडे दिशेने जाणार्या उद्यान एक्सप्रेसची धडक बसून झालेल्या अपघातात एका मेंढपाळासह सुमारे 10 ते 12 मेंढ्यांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात शुक्रवार (दि.30) रोजी संध्याकाळी पाच वाजण्याच्या सुमारास झाला. धूळा दामु कोकरे (वय 45, रा. खामकर झाप, पो, शिरापूर, ता. पारनेर जि.अहमदनगर, सध्या रा. नायगाव, मावळ) असे या अपघातामध्ये मृत्युमुखी पडलेल्या मेंढपाळांचे नाव आहे. रेल्वे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नायगावच्या हद्दीत रेल्वेच्या ट्रकजवळ बाळू चिंधु चोपडे यांच्या शेताजवळ धुळा कोकरे यांच्या सह इतरांचा मेंढ्यांचा तांडा मुकामी आला होता.
हे देखील वाचा
कुत्री शिरल्याने मेंढ्या ट्रॅकवर
शुक्रवारी (दि.30) संध्याकाळी पाच वाजण्याच्या सुमारास नायगाव हद्दीत बाळू चिंधू चोपडे याच्या शेताच्या बाजूला माळरानात शेळ्या चरत असताना अचानक काही कुत्री मेंढ्यांच्या कळपात शिरल्याने काही मेंढ्या रेल्वे ट्रॅकवर आल्या. त्यांना हुसकवण्याच्या प्रयत्न करीत असताना मागून आलेल्या उद्यान एक्सप्रेसची धडक बसुन मेंढपाळ धूळा दामु कोकरे यांचा व त्यांच्या सुमारे 10 ते 12 मेंढरांचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी तळेगाव स्टेशन लोहमार्ग पोलीस हवालदार संजय तोडमल, प्रियांका नाईक व आरपीआयचे सुर्वे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला तर तळेगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ. कानडे यांनी रात्री उशिरा शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला.