मुंबई । रेल्वे प्रशासनाने मुंबई महानगर पालिका प्रशासनाची तब्बल 366 कोटी रूपयांची पाणीपट्टी थकवल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. यामध्ये पश्चिम आणि मध्य रेल्वे अशा दोन्ही प्रशासनांचा समावेश असून जवळपास 16 वर्षांपासूनची ही थकबाकी आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते समीर झवेरी यांनी मुंबई महानगर पालिका प्रशासनाकडे माहिती अधिकारांतर्गत अर्ज केला असता ही माहिती पुढे आली आहे. मुंबई महापालिकेची पाणीपट्टी थकवण्यात पश्चिम रेल्वे आघाडीवर असून 2001 सालापासून तब्बल 205.74 कोटींची देयके थकवली आहे. तर मध्य रेल्वे प्रशासनाकडूनही जवळपास 16 वर्षांची 161.04 कोटींची पाणीपट्टी थकीत आहे. दरम्यान केंद्राने जीएसटी लागू केल्यानंतर महापालिकांचे सर्व कर रद्द झाले आहेत, तसेच मुंबई महापालिकेचेही आर्थिक स्त्रोत बंद झाले आहेत. अशा स्थितीत रेल्वेकडून कोट्यवधी रुपयांची थकबाकी महापालिकाला परवडत नाही. रेल्वे प्रशासन म्हणते मुद्दा मार्गी लावू खरोखर थकबाकी इतक्या मोठ्या प्रमाणात नसून ती फुगवण्यात आल्याचा आरोप रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आला आहे. आम्ही लवकरच महापालिका प्रशासनाच्या अधिकार्यांसोबत याबाबत एक बैठक घेणार असून हा मुद्दा मार्गी लावण्याचा प्रयत्न करू, असा दावा रेल्वे प्रशासनाने केला आहे.
मुंबई महानगर पालिका प्रशासन दरवर्षी जवळपास 26 कोटींचा निधी रेल्वे प्रशासनाला विविध उपनगरांच्या स्थानकाबाहेरील पादचारी पूलांच्या दुरूस्ती आणि त्यांच्या देखभालीसाठी देते. महापालिका प्रशासनाकडून ही जबाबदारी व्यवस्थितरित्या जबाबदारीने पार पाडली जात आहे.रेल्वे प्रशासनाकडून पाणीपट्टी देयकाबाबतची जबाबदारी व्यवस्थितरित्या पार पाडली जात नाही. याबाबत रेल्वे प्रशासनाकडे विचारणा करण्यात आली असता महापालिका प्रशासनाकडून पाणीपट्टीच्या धोरणाबाबत बदल करण्यात आल्याने देयके थकल्याचे स्पष्टीकरण दिले आहे.