नवी दिल्ली – भारतीय रेल्वे प्रशासनाने ३० जूनपर्यंत रेल्वेच्या तिकिटांचे बुकींग करणार्या प्रवाशांची तिकिटे रद्द करण्याची घोषणा केली आहे. ३० जूनपर्यंतची सर्व तिकिटे ऑटोमॅटीकपद्धतीने रद्द होणार असून या तिकिटांचा पूर्ण परतावा प्रवाशांना मिळणार असल्याचे मंगळवारी रेल्वेने जाहीर केले. दरम्यानच्या काळात स्थलांतरित कामगारांना त्यांच्या राज्यात पोहचवण्यासाठी सुरु करण्यात आलेल्या श्रमीक विशेष ट्रेनची सेवा सुरुच राहणार असल्याचे रेल्वेने म्हटले आहे. यासंदर्भातील वृत्त एएनआय या वृत्तसंस्थेने दिले आहे.
दिल्लीवरुन चालवण्यात येणार्या विशेष १५ पॅसेंजर ट्रेनची सेवा कायम राहणार असल्याचेही रेल्वेने स्पष्ट केले आहे. मंगळवारी रेल्वेने जारी केलेल्या आकडेवारीनुसार दीड लाखांहून अधिक प्रवाशांनी रेल्वेमार्फत सुरु करण्यात आलेल्या विशेष १५ ट्रेनसाठी तिकिटे खरेदी केले आहे. मंगळवारी दिल्लीमधून तीन ट्रेन परराज्यांमध्ये पाठवण्यात आल्या तर पाच राज्यांमधून दिल्लीच्या दिशेने ट्रेन रवाना झाल्याचे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केलं. मंगळवारी सोडण्यात आलेल्या ट्रेनमधून आठ हजार प्रवासी प्रवास करत असल्याचे रेल्वेने स्पष्ट केले.