नवी दिल्ली : ‘स्वाभिमानी एक्स्प्रेस’ ही विशेष रेल्वे दिल्लीहून कोल्हापूरच्या दिशेने निघाली खरी; पण ती मध्यप्रदेशातील बानमोर येथे पोहोचली. शेतकर्याच्या विविध मागण्यासांठी दिल्लीत आंदोलनासाठी गेलेले स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे दोन हजारहून अधिक कार्यकर्ते या विशेष गाडीत होते. ही गाडी उत्तरप्रदेशमधील मथुरा, कोटा, सुरत, मुंबई त्यानंतर पुणेमार्गे कोल्हापूरला येणार होती. मात्र चुकीचा सिग्नल मिळाल्याने ही रेल्वे मथुरेहून आग्रा, ग्वाल्हेरमार्गे मध्यप्रदेशमधील मुरैना जिल्ह्यातील बानमोर स्थानकात पोहोचली. गाडी भलत्याच मार्गावर येऊन थांबल्याने शेतकर्यांनी आंदोलन केले; अखेर गाडी पुन्हा महाराष्ट्राच्या दिशेने रवाना करण्यात आली. मात्र गाडीचा मार्ग अचानक बदलून सकारविरोधी बोलणार्या शेतकर्यांना संपवण्याचा प्रकार होता का? अशी चर्चा शेतकरी-कष्टकरीवर्गात सुरू आहे.
स्टेशन मास्तरच्या सतर्कतेने टळला घातपात!
केंद्र सरकारच्या धोरणांमुळे देशभरातील शेतकर्यांचे कंबरडे मोडले आहे. शेतमालाला भाव नाही, कर्जमाफीची फक्त घोषणा प्रत्यक्ष काहीच मिळाले नाही, त्यामुळे शेतकर्यांचे हाल सुरू आहेत. त्याविरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिल्लीत जाऊन आवाज उठवला. मात्र दिल्लीतून परताना आंदोलक शेतकर्यांसाठी धावणार्या विशेष रेल्वेचा मार्ग मथुरेनंतर अचानक बदलण्यात आला. ही गाडी तब्बल 160 किलोमीटरचा प्रवास करून मध्यप्रदेशातील बानमोर येथे पोहोचली. तिथे स्टेशन मास्तरने ही गाडी थांबवली. कोणतीही पूर्व सूचना नसताना स्वाभिमानी एक्स्प्रेस आल्याने ते गोंधळात पडले. सर्व गाड्या नियोजित वेळापत्रकानुसार धावत असताना ही एक्स्प्रेस मध्येच धावल्यास अपघाताची शक्यता असल्याने स्टेशन मास्तरने गाडी थांबवली. तेव्हा गाडीतील शेतकर्यांना आपला मार्ग सोडून गाडी धावल्याचे समजले. यामुळे आंदोलक शेतकरी संतप्त झाले. गाडीचा मार्ग अचानक का बदलला? रेल्वे प्रशासनाने याची कोणतीही माहिती का दिली नाही? अपघात झाला असता तर जबाबदारी कुणाची असे प्रश्न विचारून शेतकर्यांनी बानमोर स्टेशनमध्ये आंदोलन छेडले. अखेर रेल्वे प्रशासनाने शेतकरी प्रवाशांची बाजू ऐकून घेतली आणि गाडी पुन्हा महाराष्ट्राच्या दिशेने रवाना केली.
मथुरेत मिळाला चुकीचा सिग्नल
मथुरेत ‘स्वाभिमानी एक्स्प्रेस’ला चुकीचा सिग्नल मिळाला. त्यामुळे तब्बल 160 किलोमीटरपर्यंत गाडी मथुरेहून बानमोरच्या दिशेने धावली. रात्री 10 वाजता स्वाभिमानी एक्स्प्रेस दिल्लीहून महाराष्ट्राकडे रवाना झाली. मथुरेहून कोटा असा मार्ग असताना, ग्वाल्हेरच्या दिशेने रेल्वे गेली. सकाळी साडेसहा वाजता मध्यप्रदेशमधील बामनेर स्टेशनजवळ हा प्रकार समोर आला. मात्र रेल्वेने तोपर्यंत चुकीच्या मार्गाने 160 किलोमीटरचा प्रवास केला होता. स्वाभिमानी एक्सप्रेसमधील कार्यकर्त्यांनी बानमोर रेल्वे स्टेशनवर प्रचंड घोषणाबाजी केली. चुकीच्या मार्गाने रेल्वे नेल्याने प्रवाशांचा जीव धोक्यात आला, असा आरोप शेतकर्यांनी केला. शेतकरी आंदोलनासाठी दिल्लीला जाण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने खास रेल्वे बुक केली होती. सुमारे दोन हजार शेतकरी रेल्वेत होते. ही रेल्वे 4 तास उशिरा महाराष्ट्रात पोहोचणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
घडलेला प्रकार गंभीर असून त्याची चौकशी होणे आवश्यक आहे. शेतकर्यांच्या एक्स्प्रेसचा मार्ग अचानक कसा बदलला आणि त्याची माहिती संबंधित रेल्वे अधिकारी आणि स्टेशन मास्तरपर्यंत का पोहोचवली नाही?, असे प्रश्न करून सखोल चौकशीची मागणी करणार आहोत.
– राजू शेट्टी, खासदार तथा स्वाभिमानी शेतकरी संघटना प्रमुख