भुसावळ- रेल्वेच्या आरओएच शेडमधील लोखंडी पार्टची चोरी केल्याप्रकरणी रेल्वे गँगमनसह अन्य एकास अटक करण्यात आली होती तर आरोपींनी दिलेल्या जवाबानुसार रेल्वे सुरक्षा बलाचे अधिकारी आणि कर्मचारी यांनी शुक्रवारी सकाळी माजी नगरसेवक आशीक खान शेरखान यांच्या भंगारच्या दुकानासह गोडाऊनची तपासणी केल्याने शहरात खळबळ उडाली आहे. गुरूवारी रात्री 1.30 वाजता यार्डातून जाणार्या विना क्रमांकाच्या गाडीवरून गँगमन नरेश बाबुराव गढवे व त्याचा साथीदार मोनू पांडे यांना आरपीएफने अटक केली होती. आरपीएफ कोठडीदरम्यान आरोपींनी गत आठवड्यात चोरी केल्याची कबुली देत चोरीतील लोखंड हे शहरातील आशिक खान यांच्या भंगारच्या दुकानात विकल्याचे सांगितले. दोन्ही संशयीतांनी दिलेल्या माहितीवरून आरपीएफ निरीक्षक ज्ञानेश्वर पाटील, उपनिरीक्षक समाधान वाहुळकर, क्राईम इंटेलिजेन्स विभागाचे कोमलसिंग, नरेंद्र परदेशी, आर.एल.शिंदे, युसूफ तडवी, मनोज सोनवणे, महेश सपकाळे, बी.झेड.सोळंकी यांच्यासह बाजारपेठ पोलिस ठाण्याचे कर्मचार्यांनी खान याच्या भंगारच्या दुकानाची तपासणी केली. दरम्यान, भंगार व्यावसायीक आशीक खान यांचीही चौकशी केली जाणार आहे, त्यांनाही आरपीएफच्या यार्डातील ठाण्यात यावे लागणार असल्याचे आरपीएफच्या सूत्रांनी सांगितले.