भुसावळ- रेल्वेच्या आरओएच शेडमधील लोखंडी पार्ट चोरी प्रकरणी रेल्वेतील गॅगमन नरेश बाबुराव गढवे व त्याचा साथीदार मोनू पांडे यांना आरपीएफने अटक केली होती. आरोपींना तीन दिवसांची आरपीएफ कोठडी संपल्यानंतर त्यांना रविवारी न्यायालयात हजर केले असता पुन्हा तीन दिवसांची आरपीएफ कोठडी सुनावण्यात आली. रेल्वे यार्डात असलेल्या आरओएच डेपोतील 80 किलो वजनाचा लोखंडी पार्ट विना क्रमांकाच्या मोटार सायकलवर चोरून नेत असतांना रेल्वे यार्डात गुरुवारी रात्री पकडण्यात आले होते. यापूर्वीही गेल्या आठवड्यात चोरी केल्याची कबुली आरोपींनी देत हे लोखंड शहरातील भंगार व्यावसायीक आशिक खान यांना विकल्याची कबुली दिली होती. त्यानंतर पथकाने गोदामाची शुक्रवारी तपासणी केली मात्र काहीही आढळले नव्हते. रेल्वेच्या लोखंड चोरी प्रकरणी दोन संशयीतांनी दिलेल्या जबाबावरून या प्रकरणी भंगार व्यावसायीक आशिक खान यांचीही चौकशी केली जाणार आहे, त्यांना चौकशी आणि विचारपूस कामी रेल्वे यार्ड आरपीएफ ठाण्यात बोलाविणार असल्याचे आरपीएफ सूत्रांनी सांगितले. तपास उपनिरीक्षक समाधान वाहुळकर करीत आहेत.