भुसावळ- मुंबई येथील कार्मिक विभागातून मागितलेली माहिती 30 दिवसांत न दिल्याने नवी दिल्ली येथे केंद्रीय माहिती आयोगाने तक्रारदार अॅड.जितेंद्र श्रीलाल भतोडे यांच्याबाजूने निकाल देत केंद्रीय जनमाहिती अधिकारी नीलम यादव यांना 10 हजार रूपये दंड सुनावला. अॅड.भतोडे यांनी माहितीच्या अधिकाराखाली महाप्रबंधक कार्यालयातील कार्मिक विभागातून माहिती मागवली मात्र जनमाहिती अधिकार्यांनी 30 दिवसांच्या आत या अर्जाची दखल घेतली नाही. यामुळे जितेंद्र भतोडे यांनी प्रथम अपिल दाखल न करता माहितीचा अधिकार अधिनियम 2005 कलम 18 प्रमाणे केंद्रीय माहिती आयोगाकडे तक्रार केली होती. या तक्रारीवर 12 जानेवारी आणि 7 मे 2018 या दिवशी सुनावणी झाली. त्यात रेल्वे अधिकार्यांनी उपस्थित केलेले मुद्दे केंद्रीय माहिती आयोगाने फेटाळून अॅड.भतोडे यांनी उपस्थित केलेले मुद्दे ग्राह्य धरले. तसेच जनमाहिती अधिकारी नीलम यादव यांना 10 हजार दंड केला. दरमहा दोन हजार रुपयांप्रमाणे ही रक्कम कपात होईल. अॅड.भतोडे यांना अॅड.राजेश उपाध्याय यांनी सहकार्य केले.