रेल्वेच्या जागेवरील अतिक्रमण काढण्याच्या शहरात पुन्हा हालचाली

0
भुसावळ- शहरातील रेल्वे हद्दीतील दोन हजारापेक्षा अधिक झोपडे तसेच दुकाने हटवण्यासंदर्भात रेल्वे प्रशासनाने पुन्हा हालचाली गतिमान केल्या आहेत. गेल्या आठ महिन्यांपासून अतिक्रमण हटवण्याबाबत प्रक्रिया राबवण्यात येत असलीतरी त्यात दरवेळी कुठल्याना ना कुठल्या कारणाने ब्रेक लागत आहे. रेल्वेच्या जागेवरील अतिक्रमण हटविण्यापुर्वी त्यांच्या पुनर्वसनाची व्यवस्था करण्यात यावी या मागणीसाठी रेल्वे प्रशासनाच्या निषेधार्थ ऑक्टोबरमध्ये मोर्चा काढण्यात आला होता तर सर्वपक्षीय पदाधिकार्‍यांनी मोर्चा काढून पुर्नवसनाखेरीज अतिक्रमण हटवू नये, अशी मागणी केली होती.
पीआरपीचे प्रदेश महामंत्री जगन सोनवणे यांनी या संदर्भात रेल रोको आंदोलनही केले होते मात्र त्यानंतरही रेल्वे प्रशासन अतिक्रमण हटवण्यावर ठाम असून यापूर्वीच अतिक्रमितांना नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. दहावी-बारावीच्या परीक्षांमुळे लांबलेल्या मोहिमेनंतर रेल्वेने 18 ते 20 दरम्यान अतिक्रमण काढण्यासाठी हालचाली चालवल्या आहेत. रेल्वे हद्दीतील आगवाली चाळ, हद्दीवाली चाळ, चांदमारी चाळ तसेच या भागातील अतिक्रमित दुकाने हटवण्याचे रेल्वेचे नियोजन आहे. दरम्यान, सहाय्यक पोलीस अधीक्षक नीलोत्पल म्हणाले की, संबंधित तारखेस बंदोबस्त देण्यासंदर्भात वरीष्ठांचे अद्याप आदेश आलेले नाहीत, आदेश मिळताच बंदोबस्त पुरवू.