कुरकुंभ । दौंडच्या विकासात प्रामुख्याने अडचणीचा विषय बनलेल्या रेल्वे कुरकुंभ मोरी व रेल्वे संबंधित काही प्रश्नांवर बुधवारी (दि. 13) दौंड येथे आढावा बैठक झाली. धिम्या गतीने चाललेल्या कामाबाबत खासदार सुप्रिया सुळे यांनी नाराजी व्यक्त करून आगामी विकास आढावा बैठक दिवाळीच्या अगोदर घेण्याबाबतच्या सूचना अधिकार्यांना केल्या. यावेळी जिल्हा परिषद सदस्य वीरधवल जगदाळे, गुरुमुख नारंग, अप्पासाहेब पवार, हेमलता परदेशी, सुशांत दरेकर, वैशाली नागवडे, अजित बलदोटा, इंद्रजित जगदाळे, बादशाहभाई शेख, सोहेल खान, सुमंत कुमार, दौंडच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या विविध पदाधिकारी व रेल्वे अधिकारी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
अनेक वर्षांपासून दौंड शहराला अपेक्षित असणारी कुरकुंभ मोरी अजून पूर्णत्वास जाण्यासाठी बराच कालावधी लागण्याची शक्यता आहे. विविध आरोप-प्रत्यारोपांतून संघर्ष करून विविध ठिकाणांहून निधी हस्तांतर होऊनदेखील अडचणी कमी होताना दिसत नाहीत. दौंड रेल्वे स्थानकात नव्याने बनवण्यात आलेला पादचारी पूल हा तिकीट खिडकीपासून बर्याच अंतरावर आहे. तोदेखील वारंवार मागणी करून बदलला जात नाही. त्यामुळे महिला, विद्यार्थी तसेच वृद्ध प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागतो, तर बहुतांश वेळा घाईघाईने पळत रेल्वे प्लॅटफॉर्म गाठावा लागतो, अशी तक्रार यावेळी मांडण्यात आली.