रेल्वेच्या भिंतीमुळे नागरीकांचा वाढला फेरा

0

बंदोबस्तात बांधकाम ; रेल्वेने दिले सुरक्षेचे कारण

भुसावळ:- रेल्वे कॉलनीतील रेल्वेच्या फिल्टर हाऊससमोर रेल्वे प्रशासनाने भिंत उभारण्याच्या कामास मंगळवारपासून सुरुवात केली असलीतरी या भिंतीमुळे या भागातील नागरीकांची गैरसोय वाढली असून त्यांना फेर्‍यातून प्रवास करावा लागणार असल्याने त्यांनी त्यांच्यात संतापाचे वातावरण आहे. खरे तर डिसेंबर महिन्यात रेल्वे ही भिंत उभारणार होती मात्र वाढलेला रोष पाहता त्यावेळी काम थांबवण्यात आले मात्र पुन्हा रेल्वेने बंदोबस्तात कामाला गती दिली आहे.

सुरक्षेसाठी असलेली ‘भिंत गैरसोयीची’
रेल्वे परीसरातील कवाडे नगर, अनिल नगर, फिल्टर हाऊस या परीसरातील नागरीकांना ही भिंत अत्यंत गैरसोयीची ठरणार असून त्यामुळे त्यांना लांबवरचा फेरा पडणार आहे. काही महिन्यांपूर्वी नागरीकांनी या भिंतीला विरोध दर्शवल्याने काम रेंगाळले होते मात्र प्रशासनाने पुन्हा बांधकामास सुरुवात केली आहे. सुमारे 20 मीटर लांबीची तर दोन मीटर उंचीची ही भिंत बांधण्यात येत असून त्यासाठी जेसीबीसह 15 मजूर व चार फिटर काम करीत आहेत. रेल्वे कॉलन्यांमधील चोर्‍यांचे प्रकार वाढले असल्याने रेल्वे प्रशासनाने या मार्गावर भिंत उभारण्याचा निर्णय घेतला आहे. भिंत बांधली गेल्याने रेल्वेच्या कर्मचार्‍यांना लांबच्या रस्त्याने रॉ वॉटर पंप हाऊसकडे जावे लागणार आहे. सहायक पोलीस अधीक्षक नीलोत्पल, शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी निरीक्षक दीपक गंधाले यांनी मंगळवारी सकाळी भेट देऊन पाहणी केली.