रेल्वेच्या महागड्या दिव्यांच्या चोरीप्रकरणी दोघांना अटक

0

भुसावळ । येथील रेल्वे यार्डात मालगाड्यांच्या डब्यांची तपासणी करण्यासाठी लावण्यात आलेल्या महागड्या दिव्यांची चोरी करणार्‍या दोन रेल्वे कर्मचार्‍यांना भुसावळ यार्ड आरपीएफच्या गस्तीवरील पथकाने शनिवार 16 रोजी मोठ्या शिताफिने रंगेहात पकडले आहे.

दोन दिवसांची आरपीएफ कोठडी
भुसावळ रेल्वे यार्डात वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त ए.पी.दुबे, सहाय्यक आयुक्त राजेश दिक्षीत व यार्ड निरीक्षक ज्ञानेश्वर पाटील यांंच्या मार्गदर्शनाखाली आरपीएफ यार्डचे हेड कॉन्स्टेबल रंजन शिंदे व प्रेमसिंह हे गस्तीवर असतांना त्यांनी रेल्वेचे ‘अ’ श्रेणी पाँईंटसमन निवृत्ती मुरलीधर पाटील (रा.दत्त नगर,भुसावळ हायस्कूल समोर) व देविदास नन्हेलाल मकारे (रा.रेणूका माता नगर, खडका चौफुल्ली जवळ) या दोघांना डाऊन मार्शलिंग यार्ड लाईन क्रमांक 7 व 8 च्या मध्यभागी मालगाडीचे डबे तपासणीसाठी सीअँडडब्ल्यू विभागातर्फे लावण्यात आलेले 3 एलईडी दिवे चोरुन नेतांना आरसी कॅबीन सायकल स्टँन्डजवळ रंगेहात पकडून एएसआय अत्तर सिंह यांना घटनेची माहिती दिली. तात्काळ सिंह व मोहन रंधे हे घटनास्थळी पहोचले व दोघांना ताब्यात घेत त्यांच्याविरुध्द यार्ड आरपीएफ ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. संशयित रेल्वे कर्मचार्‍यांकडून टिव्हीएस कंपनीची मोटार सायकल (एमएच 19 ए.झेड. 4003) ही सुध्दा जप्त करण्यात आली आहे. या दोघांना शनिवार 16 रोजी भुसावळ रेल्वे न्यायालयात हजर केले असता दोन दिवस आरपीएफ कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायाधीश एम.एम. बवरे यांनी दिले. रेल्वेचे सरकारी वकील सुट्टीवर असल्याने तपासी अधिकारी एएसआय अत्तर सिंह यांनी युक्तिवाद केला. तर आरोपींतर्फे अ‍ॅड. आर.एम. यादव व अ‍ॅड.मतीन अहमद यांनी काम पाहीले.